आहाराचाही होत असतो आपल्या मनावर परिणाम !साधू-संतांनी खूप पूर्वी लिहून ठेवले आहे की, ‘जसे खावे अन्न तसेच होईल मन’. म्हणजे पूर्वी लोक खाण्याबाबत त्याहून जो स्वयंपाक करतो त्याच्याबाबतीतही खूप जागरूक राहात होते.

अन्नावर बाह्य शक्तीचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे अन्नात काही दोष झाल्यास ते खाणा-या व्यक्तीला त्याचा त्रास होतो. शिजवलेले अन्न विशेषकरून अधिक संवेदनशील असते. त्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषल्या जाऊ शकतात. म्हणून शिजवलेले अन्न ग्रहण करताना अत्यंत सावध असायला हवे. ते अन्न कोणी कोठे आणि कसे शिजवले, तसेच वाढले कोणी? या सर्व घटकांचा प्रभाव त्या अन्नावर पर्यायाने खाण्यावर पडतो. 

प्राचीन काळात राजे-महाराजे यांच्या राजवाड्यात स्वयंपाक्यांना खूप महत्त्व दिले जात होते. त्यांना ‘महाराज’ ही उपाधी देण्यात आलेली होती. त्यांना योग्य सन्मानही दिला जात असे. अन्नाला त्याकाळात खूप महत्त्व होते, कारण व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, प्रकृती ही ती व्यक्ती कोणते अन्न ग्रहण करते, यावर अवलंबून राहत होती. म्हणूनच 

‘वदनी कवळ घेता 
नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते 
नाम घेता फुकाचे 
जीवन करी जिवित्वा 
जाणिजे यज्ञकर्म 
उदरभरण नोहे 
अन्न हे पूर्णब्रह्म’ 

असे म्हटले आहे. स्वयंपाक्याने स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुतलेले असायला हवेत. त्याने सेवा भावनेने कामाला सुरुवात केलेली असावी. तो प्रसन्न मुद्रा ठेवणारा असावा. तरच अन्नात प्रेम आणि सकारात्मक शक्तीचा संचार घडवून आणू शकतो. घरात ठरावीक व्यक्तीनेच अन्न शिजवण्याचे व वाढण्याचे काम करावे. अनेकांनी आपले कसब स्वयंपाकघरात आजमावून पाहण्याचे टाळावे. 

आजच्या बुफे किंवा स्वत:च वाढून घेण्याच्या विरुद्ध आहे. ठरावीकच व्यक्तींनी हे काम केल्यास अन्न आरोग्यपूर्ण राहील. वरण, भात, पोळी, भाजी असे शिजवलेले अन्न नेहमी झाकून ठेवावे, कारण उघड्या अन्नावर व्यक्त-अव्यक्त इच्छा आकांक्षांचा परिणाम होत असतो. तो दिसत नसला तरी अन्नावर आणि तो ग्रहण करणा-यावर त्याचा प्रभाव दिसतो. शिजवलेले अन्न हे चविष्ट्र असते, त्यामुळे ते ग्रहण करताना सावधगिरी बाळगायला हवी. अन्न ग्रहण करायचे ते स्थान आरोग्यपूर्ण असावे. अन्न वाढणारा प्रसन्न व आनंदी असायला हवा. अशा छोट्या गोष्टी कडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. 

कोणी खिन्न, क्रोधी, विचलित किंवा आक्रमक परिस्थितीत असलेल्या माणसाने तयार केलेल्या स्वयंपाकावर तशाच प्रवृत्तीचा परिणाम झालेला दिसून येतो. दूध, दही, पक्व फळे, सुका मेवा, साबुदाणा, लाह्या, वाळलेल्या धान्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही. हे पदार्थ खाण्यास परवानगी असते. माणसाने असाच सात्त्विक आहार घ्यायला हवा, मात्र दूध आणि फळे एकत्र खाऊ नये. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यासाठी एक म्हण आहे, ‘खाल तसे व्हाल’. ती खरीही आहे.
Food also affects our mood
थोडे नवीन जरा जुने