नात्यातील इगो विसरा आणि प्रेम आणि आपुलकी लक्षात ठेवा....


इगो हा नात्यातील काटा आहे, तर प्रेम आणि आपुलकी हे नातं फुलवण्यास लागणारं खतपाणी आहे. ज्यांना नात्याची किंमत समजते, त्यांनाच स्वत:च्या चुका समजतात व ते सुधारण्याचा प्रयत्न करतात.

एकत्र राहताना भांड्याला भांड लागतं असं म्हणून नवरा बायकोने लहान लहान भांडणाकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला मोठे देत असतात तो अगदी योग्यच आहे; परंतु अलीकडे पती-पत्नी दोघेही शिकलेले, दोघेही कमावते, त्यामुळे इगो हा भाग त्यांच्यात असतोच. दोन व्यक्तींमध्ये लहान लहान वाद होणारच; पण ते वाद नाते तुटेल इतकेही ताणू नका. नातं हे दोघांनी मिळून जपायचं असतं. एकाने बिघडवलं तर दुसर्‍याने सावरायचं असतं.


नातं तुटण्याची अशी अनेक कारणे असतात. ती कारणे शोधून नातं तुटणार नाही, याची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. नाते एकदा तुटले की ते पुन्हा जुळवणे अवघड असते. नाते का तुटले याची कारणे समजून घेतलीत तर कदाचित ते नाते पुन्हा जुळण्यास मदत होईल. नात्यात निष्ठा असायला हवी. स्वत:च्या पार्टनरबरोबर प्रामाणिक असायला हवे. नात्यात अहंकार आला की, नातं संपुष्टात यायला वेळ लागत नाही.

नात्यात संवाद नसेल तर नातं लवकर संपतं. कोणालाच मनातलं वाचता येत नाही. त्यामुळे नात्यात संवाद आवश्यक असतो. बोलण्याने माणूस उलगडत जातो. नात्यात संशयाला जागा नकोच त्यामुळे संशय घ्यावा लागेल असे वागणे टाळा. संशयाचा किडा एकदा डोक्यात घुसला की, नातं संपवल्याशिवाय तो बाहेर निघत नाही.संशयास्पद वागणूक टाळा व जोडीदारावर उगाचच संशय घेणेही टाळा.

नात्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवंच. हे करु नको, ते करु नको, याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको अशी बंधने लादल्यावर समोरचा कंटाळतो. अशा बंधनांमुळे जोडीदाराला नाते ओझे वाटू लागते. त्यामुळे नाते लवकर तुटते. जोडीदारावर प्रेम असेल तर त्याची काळजीही वाटतेच, परंतु फक्त वाटून चालत नाही तर त्याच्याबद्दलची काळजी लहान-लहान गोष्टींतून दिसू द्या. ती दिसत नसेल तर नाते दुरावण्याची शक्यता असते. थोडा जरी वाद झाला तर तो नेमका कशामुळे झाला, हे स्वत: समजून घ्या व जोडीदारालाही समजून सांगा. एकमेकांची माफी मागत पुन्हा आनंदाने राहा.

माणसे चुकतात, चुका होतात, होणारच. आपण माणसं आहोत देव नाही; पण स्वत:ची चूक उमगायला हवी. ती उमगली तरी स्वीकारायला हवी. तसे न केल्यास सर्व समस्या निर्माण होतात. स्वत:ची चूक समजली व ती स्वीकारली तर सर्वच गोष्टी सोप्या होतात. मग समस्या समस्याच वाटत नाहीत. नात्यात नेहमी एक गोष्ट विसरा तो म्हणजे, इगो आणि कायम दोन गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे प्रेम आणि आपुलकी.

Forget Iago and remember love and affection
थोडे नवीन जरा जुने