घरात नेहमी प्रसन्न वातावरण ठेवायचे असेल तर, करा 'हे' साधे-सोपे उपाय !


सुगंधांमुळे घरातलं वातावरण प्रफुल्लित तर होतंच पण त्याचबरोबर आपल्या मनाचं स्वास्थ्यही उत्साही बनतं. म्हणूनच सध्या घर आकर्षक करण्याबरोबरच घर प्रसन्न राहण्यासाठी विविध सुगंधांचा (फ्रेगरन्स) वापर करण्याचा ट्रेंड रुजू लागलाय. त्यासाठी बाजारात अशा प्रकारचे अनेक सुगंध उपलब्ध झालेत, जे आपल्याला घरात सहज वापरता येतात.


तुम्हाला ती जाहिरात आठवते का? पावसाळ्याचे दिवस असतात. घरात नव-याच्या ऑफिसमधील बॉस येणार असतात. म्हणून एक गृहिणी तिच्या घरात सुगंधाची पखरण करते आणि चुटकीसरशी घरातील ‘बदबू’ दूर करते. तिच्या या जलद कृतीमुळे घरात येणारे पाहुणे आणि पर्यायाने नवरा खूश होतो.


तिन्ही सांजेच्या वेळी अगरबत्ती लावण्यामागचा धार्मिक उद्देशही घरातलं वातावरण प्रसन्न करणे हाच होता. तसंही, चांगला सुगंध कोणाला आवडत नाही? ऑफिसला जाताना आपण आवर्जून परफ्युम वापरतो. मुळात ऑफिसला जाताना झकपक दिसण्यासाठी वापरण्यात आलेलं परफ्युम हे प्रतिष्ठेचं लक्षण झालंय. आपल्या मनाला उत्साहित करण्याचे काम हे सुगंध करतात.. हो नं! मग हीच सुगंध देणारी, वातावरण प्रफुल्लित ठेवणारी परफ्युम्स घरात वापरली तर? घर सुगंधी होईलच, पण त्याचबरोबर घरात येणारे पाहुणेही खूश होतील. नेमकी हीच क्लृप्ती परफ्युम्स बनवणा-या कंपन्यांनी वापरली आहे.


हे सांगण्याचं कारणं एवढंच की, सध्या घर आकर्षक करण्यासाठी वापरण्यात येणा-या रंगांप्रमाणे घर प्रसन्न राहण्यासाठी विविध सुगंधांचा (फ्रेगरन्स) वापर करण्याचा ट्रेंड रुजू लागलाय. त्यासाठी आपल्याला बाजारात अशा प्रकारचे अनेक परफ्युम्स उपलब्ध झालेत की जे आपल्याला घरातही सहज वापरता येतील. विशेषत: पावसाळ्यात घरात येणारा कुबट वास घालवण्यासाठी या सुगंधी द्रव्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यासाठी परफ्युम्स बनवणा-या काही कंपन्यांचे नॅचरल फ्रेगरन्स वापरू शकता. ब-याच ठिकाणी असे फ्रेगरन्स तयार करणा-या कंपन्या आपल्या घरात सुगंधी वातावरण तयार करण्याचं काँट्रॅक्ट घेतात. कंपनीचा माणूस तुमच्या घरच्या रचनेचा अभ्यास करतो आणि त्यावरून घराच्या कोणत्या कोप-यात अथवा मोक्याच्या ठिकाणी सुगंधाचा सुयोग्य वापर करता येईल ते ठरवतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणारा माणूसही थोडासा ‘तिखट नाकाचा’ असावा लागतो.


घरासाठी मिळणा-या फ्रेगरन्सचे प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन भाग पडतात. नैसर्गिक फ्रेगरन्समध्ये गुलाब, जाई-जुई, चंदन अशा प्रकारच्या फ्रेगरन्सला जास्त मागणी आहे. पॉटप्युरी, सेंटेड कँडल्स, रीड डिफ्युजर, व्हेपोरायझर्स अशा काही बाजारात उपलब्ध असलेल्या साधनांच्या साहाय्याने या फ्रेगरन्सचा वापर केला जाऊ शकतो. यातल्या पॉटप्युरी या प्रकारात लाकडासारखी दिसणारी विविध रंगांची फुलं असतात. सर्वसाधारणपणे पॉटप्युरीची बॅग आपल्याला मॉलमध्ये १५० रुपयांपासून उपलब्ध आहे. या बॅगमध्ये लाकडी फुलांसोबत अत्तराची कुपी मिळते. त्यात संत्र, जाई-जुई, मोग-याचे सुगंध असतात. सणावाराच्या निमित्तानं एखाद्या आकर्षक चिनी मातीच्या भांडय़ात ही फुलं ठेवून त्यावर अत्तर (एसेन्शियल ऑइल) टाकल्यास किमान सहा महिने हा सुगंध टिकून राहतो. यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांमुळे एखाद्या शोपीसच्या जागीही त्याचा वापर करता येऊ शकतो. बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या सुगंधी मेणबत्त्याही उपलब्ध आहेत. रीड डिफ्युजर प्रकारात एका फुलदाणीचा वापर केलेला असतो. त्यात सर्वसाधारणपणे तारांसारख्या दिसणा-या कृत्रिम फुलांचा वापर केलेला असतो, तर व्हेपोरायझर पद्धतीत एका यंत्राद्वारे वेळ सेट केली जाते. म्हणजे एका ठरावीक वेळेनंतर तुमचं घर सुगंधीत होतं. त्यातही सुगंधांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. या तिन्ही प्रकारातल्या सुगंधांची किंमत ४०० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.


घरात सुगंधाचा वापर कसा करावा?


लिव्हिंग रूम : लिव्हिंग रूम म्हणजे आपल्या घराचा आरसा असतो. घर किती टापटीप आहे हे लिव्हिंग रूमवरून घरात येणा-या पाहुण्यांच्या चटकन लक्षात येतं. त्यामुळे ‘रीड डिफ्युजर’ लिव्हिंग रूमसाठी वापरणं जास्त सोईचं ठरतं. त्याशिवाय हे डिफ्युजर इको फ्रेंडली, अग्निरोधक आणि मेंटेनन्स फ्री असतात. संत्र, ब्लॉसम, लव्हेंडर, लेमन ग्रास, मेलॉन मस्क अशा वेगवेगळ्या अरोमाजमध्ये ती उपलब्ध आहेत. सुगंधी मेणबत्त्याही तुमच्या लिव्हिंग रूमच्या लूकमध्ये ‘चार चाँद’ लावतील.


बेडरूम : बेडरूममध्ये आपण आपलं खासगी आयुष्य जगत असतो. त्यामुळे बेडरूममध्ये ‘कम्फर्ट’ महत्त्वाचा असतो. बेडरूमच्या ज्या भागात हवा खेळती राहत नाही, अशा कोंदट भागात ‘व्हेपोरायझर’चा वापर करावा. एका बॉलमध्ये पाणी घेऊन त्यात व्हेपोरायझर तेलाचे थेंब टाकल्यास त्याचा ‘माइल्ड फ्रेगरन्स’ रूममध्ये नवचैतन्य टिकवून ठेवतो. सर्वसाधारणपणे महिला वर्गाला फुलांचा सुगंध जास्त आवडतो. त्यामुळे महिला वर्गाची आवड लक्षात घेऊन लीलॅक, फ्लोरल व्हॉलेट, जॅस्मीन हे फ्लेवर बाजारात मिळतात. त्याशिवाय फळांचा रस असलेल्या (fruitextract) फ्लेव्हर्समध्येही वेपोरायझर्स उपलब्ध आहेत. त्यात विशेषत्वाने ब्लॅकबेरी सागा, सायट्रस क्रीम, मेलन मस्क, जिंजर प्लम, लाइम, किवी, पीच, स्ट्रॉबेरी, आणि बेरीज या फ्लेव्हरला मागणी जास्त आहे. बेडरूमच्या कपाटात पॉटप्युरीचा वापर केल्यास तुमचे कपडेही सुगंधीत बनतील.


बाथरूम : बाथरूममध्ये सुगंधी मेणबत्त्यांचा वापर करावा. मात्र त्यासाठी वापरण्यात येणारा स्टँड योग्य ठिकाणी काळजीपूर्वक ठेवण्याची खबरदारी घ्यावी. थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर ‘फ्रेगरन्स स्टोन्स’ वापरावेत. विविध रंगांचे आणि आकाराचे हे स्टोन्स वापरल्यास छोटय़ाशा बाथरूमचा लूक ट्रेंडी होऊ शकतो. यात ग्रीन टी, लेमन ग्रास, मेलन मस्क, या नसíगक सुगंधांमध्ये मेणबत्त्या उपलब्ध आहेत. दिसायला नाजूक असल्यामुळे या मेणबत्त्या तुम्ही गिफ्ट म्हणूनही एखाद्याला देऊ शकतात.


स्वैंपाकघर : स्वैपाकघरामध्ये आईने काय जेवण केलंय हे आपण लिव्हिंग रूममध्ये बसूनही सांगू शकतो. मुद्दा हा की किचनमध्ये अनेक प्रकारच्या सुगंधांची मांदियाळीच असते. पण चिकन, मासे, कांदा, लसूण यांसारखे तिखट आणि उग्र पदार्थाचे वास आपल्या नाकाला नकोसे वाटतात. त्यामुळे चंदन, जाई जुई, गुलाबाच्या तेलाच्या कुपीसकट उपलब्ध असलेले पॉटप्युरी प्रकारातले दीर्घकाळ टिकणारे फ्रेगरन्स वापरणं सोईचं ठरतं. पॉटप्युरी फ्रेगरन्समुळे स्वैपाकघरामधील नको असलेली दुर्गंधी घालवता येतेच, पण त्याचबरोबर गृहिणींना जेवण बनवण्याचा उत्साहसुद्धा वाटतो.


आतापर्यंतच्या लेखातून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की सुवासिक सुगंधांमुळे घरातलं वातावरण प्रफुल्लित तर होतंच पण त्याचबरोबर आपल्या मनाचं स्वास्थ्यही उत्साही बनतं. एखाद्या व्यक्तीला शांत किंवा मंद (माइल्ड) सुगंध आवडत असेल तर ती व्यक्ती शांत स्वभावाची असू शकते. तर उग्र वास हा अनेकांना नकोसा वाटतो. पण घरात वापरण्यात येणा-या लेमन ग्रास प्रकारातील अरोमामुळे तुमच्या शरीरावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही फुलांचा सुगंध आपल्याला ‘रोमँटीक’ वातावरणात घेऊन जातो. तर चंदनाच्या सुगंधाने मन भक्तिमय होतं. त्यामुळे शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की, आपलं मन आणि घर आणि उत्साहित ठेवण्यासाठी अशा सुगंधाचा वापर नक्की करावा. कारण जिथे घर प्रसन्न असतं तिथे देवाचा वास असतो.


If you want to always have a happy atmosphere at home, make 'It' a simple-simple solution
थोडे नवीन जरा जुने