सर्वच महिलांमध्ये जीन्सचा जलवा बघायला मिळतो पण....
महिलांचे जीन्स पँट घालण्याचे प्रमाण वाढले आहे. जीन्स घालणार्‍या महिलांच्या वाढत्या संख्येवरुन जीन्स हा त्यांचा आवडता पोशाख झाला असल्याचे दिसून येते. कारण महिलांच्या इतर पोशाखांच्या तुलनेत जीन्स हा अत्यंत आरामदायक आणि सुविधाजनक पोशाख आहे.
भारतात सर्वत्र जीन्सचा जलवा बघायला मिळतो. पण,तसं बघितलं तर जीन्स हा पोशाख मुळात अमेरिकेत वापरला जात होता. तिथले कर्मचारी आणि काऊबॉय जीन्सचा वापर करत असत. हळूहळू त्याचा विस्तार भारतात झाला. जीन्सच्या टिकाऊपणामुळे आणि सोयीस्करपणामुळे पुरुषांसोबतच महिलाही त्याचा वापर करू लागल्या.

फॅशनच्या बाबतीत सगळ्यात सजग असतात ते तरुण, फॅशनची दशा आणि दिशा ही तरुणांच्या आवडी-निवडीवर अवलंबून असते. सध्याच्या काळात दर शुक्रवारी फॅशन बदलते असे म्हणतात. असे म्हणण्याचे कारण असे की, दर शुक्रवारी आलेल्या नव्या फिल्ममधील कपड्यांच्या फॅशननुसार तरुणवर्ग त्यांची फॅशन बदलतात.

आतापर्यंत कितीतरी प्रकारचे कपड्यांचे फॅशन आले आणि गेले; पण या युगात संपूर्ण जगात अजूनही फॅशनच्या दुनियेत अधिराज्य करतेय ती म्हणजे जीन्स असे मान्य करावेच लागेल.जीन्स सर्वात लोकप्रिय होण्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही.ती कशीही वापरली तरी चालते.

शिवाय ती खराब झालेली कळत नाही. पण तरीही दोन-तीन वेळा वापरल्यानंतर धुणे उत्तम.ज्या व्यक्तींना खूप प्रवास करावा लागतो वा ज्यांचे प्रोफेशन खूप धावपळीचे आहे, त्यांच्यासाठी जीन्स हा एक चांगला पर्याय ठरतो. कॉलेजला जाणार्‍या मुला-मुलींचा तर हा आवडता पोषाख आहे.

मेट्रो शहरच नव्हे तर छोट्या छोट्या शहरांमध्येही जीन्सचा वापर वाढलेला आहे. कारण ती वापरणं सोपे आहे. तिच्यात वावरणंही सोप्प आहे. एक जीन्स विकत घेतली तरी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे (रंगसंगतीचे) टॉप्स घालून पोशाखात वैविध्यता आणता येते आणि त्यामुळे खर्चही कमी होतो.

जेव्हापासून स्ट्रेचेबल जीन्स मार्केटमध्ये आलेत तेव्हापासून महिलांची त्याला जास्त पसंती मिळू लागली.आणि तेव्हापासूनच जीन्स हा मुली आणि महिलांचा आवडता पोशाख बनला. ड्रेस-ओढणी, साडी अशा प्रकारचा पोशाख घालून काम करणं तसं अवघडच असतं. तर जीन्स टॉपमध्ये काम करणं सुटसुटीत होतं. छोट्या टॉप बरोबरच लांब कुर्ती आणि शर्टही जीन्सवर घालू शकता.
थोडे नवीन जरा जुने