ग्रीन-टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही, जाणून घ्या !


Know-if-drinking-green-tea-is-beneficial-for-health
गरमागरम, आलं घातलेल्या चहाचा घोट घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. अनेकांना चहाचं हे रूप आवडत असलं तरी थोडय़ाशा वेगळय़ा अशा ‘ग्रीन टी’ची चवंही चाखून पाहायला हरकत नाही. हा चहा नियमित प्यायल्याने वजन कमी होतं, शिवाय कर्करोगासारखे आजार होण्यास प्रतिबंध होतो, असं संशोधनाअंती सिद्ध झालं आहे.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाची सकाळ गरमागरम, वाफाळत्या चहाने सुरुवात होते. ‘गवती चहा’, ‘मसला चहा’, ‘आलं-वेलचीयुक्त चहा’ असे चहाचे अनेक प्रकार आपल्यापैकी बहुतेकांच्या आवडीचे असतात. बाजारात ब्लॅक, ग्रीन, उलोंग टी या स्वरूपात चहा मिळतो. या सर्व पर्यायांत ‘ग्रीन टी’चा पर्याय सवार्थानं चांगला म्हणता येईल. कारण इतर प्रकारांच्या मानानं ‘ग्रीन टी’ बनवताना कमीत कमी प्रक्रिया केली जाते. 


जसं की, फक्त उकळवणं आणि वाळवणं. या चहाचा रंगही कायम ठेवला जातो. त्यामुळे इतर चहापेक्षा यातली पोषकतत्त्वं आणि संप्रेरकं नष्ट न होता ती कायम राहतात. जपान आणि चीनमध्ये हजारो वर्षापासून ‘ग्रीन टी’चं अस्तित्व आहे. संशोधकांनी जेव्हा जपानमधल्या विविध भागांचा अभ्यास केला, तेव्हा तिथल्या भागांत ‘ग्रीन टी’ जास्त प्यायला जातोय व त्यामुळे तिथे कर्करोगाचं प्रमाण तुलनेत कमी असल्याचं आढळलं. 

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण लक्षणीय असतं. त्यातील फ्लेव्होनाइड्समुळे शरीरातील विषद्रव्ये आणि चयापचयामुळे तयार होत असणा-या प्रीरेडिकल्सच्या प्रमाणात चांगली घट होऊ शकते. या गुणांमुळे केवळ कर्करोगच नाही तर हृदयरोग, मधुमेह, वाढतं कोलेस्टेरॉल यांसारख्या अनेक विकारांना दूर ठेवता येऊ शकतं. याखेरीज वाढतं वय झाकण्याचा गुण या ग्रीन टीमध्ये असतो. 

ग्रीन टी हे एक नैसर्गिक असं ‘फॅट्स बर्नर’ही ठरू शकतं. खरोखरच ग्रीन टीमध्ये असे काही गुण असतात, की जे शरीरातील चयापचयाची गती वाढवतात आणि त्यामुळेच वजन कमी करायला मदत मिळते. या चहातील पोली फिनोल्स हे घटक लिव्हर आणि स्नायूपेशी यातून फॅट्सचं ज्वलन करण्याची प्रक्रिया वाढीस लावतात. विशेष म्हणजे पोटावरील चरबी कमी होण्यास जास्त मदत मिळते. ग्रीन टीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

फ्लूसारख्या आजारापासून आपला बचाव होऊ शकतो. दातांच्या आरोग्यासाठी ग्रीन टीचा चांगला उपयोग होऊ शकतो, असंही म्हटलं जातं. अजूनही विशेष म्हणजे ग्रीन टीमुळे वृद्धापकाळातही आपली स्मरणशक्ती शाबूत राहायला मदत होते. ग्रीन टी बाजारात सहजपणे मिळतो. पूर्वी केवळ परदेशातून आलेला ग्रीन टी मिळत असे. पण आता आपल्याकडेही त्याची निर्मिती होऊ लागली आहे. 

आता तर ऑरगॅनिक ‘ग्रीन टी’ही मिळू लागला आहे. प्रसिद्ध चहा उत्पादक कंपन्याही ग्रीन टीची निर्मिती करू लागल्या आहेत. अजूनही आपल्याकडे ग्रीन टी घेण्याचं प्रमाण चीन किंवा जपानसारख्या देशांपेक्षा कमीच आहे. कारण सध्या त्याचं उत्पादन एकूण चहाच्या उत्पादनाच्या केवळ २० टक्के इतकंच आहे.

ग्रीन - टी कसा बनवाल? 

ग्रीन टीमध्ये साखर किंवा दूध घालू नये. तसं केल्याने त्यातील गुणधर्म कमी होतात. शिवाय त्यात दूध आणि साखर न घातल्याने ते ‘झीरो कॅलरी’ म्हणून वजन कमी करण्यासाठी घेता येतं.

बाजारातून आणलेला ग्रीन टी पॅकबंद असला तरीही तो परत हवाबंद डब्यात ठेवावा. म्हणजे त्यातील गुणधर्म टिकून राहतील.

चहा बनवताना आधी पाणी उकळून घ्यावं. गॅस बंद करावा आणि मग ग्रीन चहाची पूड टाकून काही वेळ झाकण ठेवावं. मग चहा गाळून प्यावा.

योग्य फायदा मिळावा म्हणून दररोज तीन ते चार कप ग्रीन टीचा समावेश आपल्या आहारात करायला हरकत नाही.

Know if drinking green-tea is beneficial for health
थोडे नवीन जरा जुने