जाणून घ्या हाडाच्या कॅन्सर बद्दल,ही आहेत लक्षणे...


विशिष्ट प्रकारचा हाडांचा आजार असलेल्यांना आणि रेडिएशन घेतलेल्यांना हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा कॅन्सर तीन प्रकारचा असतो. ऑस्टिओजेनिक सार्कोेमा प्रकारात लहान मुलांच्या किंवा तरुणांच्या मांडीचे हाड, पायाचे हाड किंवा दंडाचे हाड या ठिकाणी तो होतो. 

एविंग सार्कोभा प्रकारही लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही आढळतो. कमरेचे हाड, मणका किंवा पाठीचे हाड, डोक्याचे हाड व इतर चपट्या हाडांमध्ये तो आढळतो. कोन्ड्रोसार्कोमा प्रकार वृद्धांमध्ये आढळतो, यात कमरेच्या, मांडीच्या किंवा खांद्याच्या हाडाला ही व्याधी जडलेली दिसते.

हाडात दुखणे, सूज येणे ही लक्षणे यात दिसतात. काही रुग्णांच्या हाडात गाठ दिसते. कॅन्सरग्रस्त हाड अशक्त असल्याने लहानशा आघातानेही तुटते व हा आजार लक्षात येतो. त्याशिवाय वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकला होणे ही चतुर्थ अवस्थेतील कॅन्सरची लक्षणे असतात.

रक्ताच्या तपासणीद्वारे रक्तातील अनेक घटकांची तपासणी करण्यात येते. क्ष-किरणांद्वारे हाडाच्या दुखणार्‍या भागाची पाहणी करण्यात येते. पूर्वी भूल देऊन बायोप्सी करण्यात येत असे. आता ऑपरेशन न करता, सुईने गाठीचा तुकडा तपासणीसाठी काढण्यात येतो. सीटी-स्कॅन, बॉनस्कॅन व अन्य तपासण्यांद्वारे याची लागण किती झाली आहे, हे तपासले जाते.

तरुण वयात आढळणारा हा आजार इतरत्र पसरण्याची शक्यता अधिक असते. दुर्दैवाने याचे लवकर निदान करण्याच्या खात्रीशीर तपासण्या अद्याप आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तरीही रुग्ण कॅन्सरमुक्त करणे आणि उपचारानंतर त्याला सुखाने जगता यावे हा हेतू ठेवून तज्ञ त्यांच्या उपचारांचे नियोजन करतात.

पूर्वी या कॅन्सरमध्ये हात, पाय हे संपूर्ण अवयवच काढून टाकले जात. आता विकसित उपचारांमुळे रुग्णाचे अवयव वाचविण्यात कॅन्सर तज्ञांना यश आले आहे. ज्या रुग्णांच्या हाडांमध्येच कॅन्सर आहे त्यांची शस्त्रक्रिया करून तेवढा भाग काढून टाकता येतो व त्याठिकाणी कृत्रिम हाड किंवा सांधा बसवता येतो. मात्र, त्याच्या सभोवतालच्या मांसपेशींमध्ये व्याधी पसरली असल्यास पूर्ण अवयव काढून टाकावा लागतो.

अनेकदा अवयव जाणार म्हणून रुग्ण शस्त्रकियेला तयार होत नाहीत आणि आयुष्यच गमवून बसतात. खरे तर अवयवापेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे. थोड्या प्रयत्नानंतर आपण एखाद्या अवयवाशिवाय अत्यंत आनंदाने आयुष्य जगू शकतो.

किमोथेरपी व रेडिओथेरपीसारख्या अत्याधुनिक औषधांमुळे या उपचारांचे खात्रीशीर फायदे रुग्णांना होत आहेत. काही प्रकारच्या हाडाच्या कॅन्सरसाठी हे उपाय यशस्वी ठरल्याने शस्त्रक्रियाही करावी लागत नाही. व्याधी वाढलेल्या अवस्थेत रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

अर्थात कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून नियमित तपासणी गरजेचीच, पण एखादा अवयव काढावा लागला तरी उमेद न गमावता, स्वतंत्रपणे आयुष्य जगणारे रुग्ण अनेक आदर्श तयार करतात. वैभव हा त्यांच्यापैकीच एक. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने नियतीवर विजय मिळवला. किमोथेरपीची तीन इंजेक्शने,

शस्त्रक्रिया करून कॅन्सरग्रस्त सांधा काढणे आणि कृत्रिम सांधा बसवणे, पुन्हा किमोथेरपी एवढे दिव्य पार करूनही मला सचिन तेंडूलकर बनायचे आहे हे त्याचे स्वप्न कायम आहे. फक्त स्वप्न नाही, तर उपचार सुरू असताना तो नववीची परीक्षाही यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.

Learn about bone cancer, these are the symptoms
थोडे नवीन जरा जुने