जाणून घ्या, जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणे !


सामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणा-या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता. हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणा-या अडथळयांमुळेही हृदयविकार वाढतो.


मात्र ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते. आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तरीही संतुलीत जेवण, योग्य जीवनशैलीचं पालन यांनी एलडीएलच्या प्रमाणाला नियंत्रित करता येऊ शकतं.

हृदयाशी संबंधित आजार कोणते?

प्रमुख आजार आहे हृदयविकार. या संज्ञेत हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो. अ‍ॅनजायना पेक्टोरिस (Angina pectoris हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं), आर्टिरिओ स्क्लेरॉसिस (Areterio sclerosis- शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणं), कार्डिअ‍ॅक अरेस्ट (Cardiac arres- हृदयक्रिया बंद पडणं), कॉरोनरी हार्ट डिसाज् (Coronary heart disease- हृदयाला रक्तपुरवठा करणा-या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं), व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज् (Valvular heart disease – हृदयातील झडपेचा आजार) ही दुखणी हृदयविकार किंवा हृद्रोगात (Heart disease) येतात.

हृदय बंद पडतं किंवा त्याच्या कार्यात बिघाड होतो म्हणजे काय होतं?

हृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोडय़ा भागांवर झाला असेल छोटय़ा प्रमाणातील हार्ट अटॅक येतो. आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला मोठय़ा प्रमाणातील हार्ट अटॅक किंवा हृदयाचा तीव्र झटका असं म्हणतात.

हृदयाच्या झटक्याची लक्षणं कोणती?

हृदयरोगाची लक्षणं झटका येण्याच्या अगोदरच दिसून येतात, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हृदरोगी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्याला हृदयाचा झटका आला आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. त्यावेळी श्वास घ्यायला त्रास होतो. भरपूर घाम येतो. मळमळतं. चक्कर येते. उलटया होतात. शरीराला कंप सुटतो. ही हृदयाच्या झटक्याची सामान्य लक्षणं आहेत. कधीकधी छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात. या वेदना छाती किंवा पोटाच्या मध्यभागी वा पाठीच्या मणक्यात होतात. तिथून त्या मानेत किंवा डाव्या हाताकडे जाऊ शकतात. या वेदना २० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्णाच्या शरीराचा रंग बदलतो. अचानक रक्तदाब कमी होऊन मृत्यूही येतो.

या आजारावर काही प्रथमोपचार आहेत का?

हो. आहेत ना. पण हे उपचार रुग्णावर झटकन झाले पाहिजेत. आणि ते झाले तर रुग्णाचे जीव वाचतात. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवं झोपवावं. त्याचे सर्व घट्ट कपडे सल करावेत. जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्सिजन द्यावा. नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरब्रिटेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात अ‍ॅस्प्रीन ढवळून द्यावं.

डॉक्टरांकडून केले जाणारे उपचार कोणते?

हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार आणि इस्पितळात भरती करणं गरजेचं असतं. हृदयाचा त्रास निर्माण झाल्याची काही मिनिटं, काही तास जरा संकटाचे असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधं दिली जातात. डॉक्टर रुग्णांची सूक्ष्म तपासणी करतात. हृदयाची स्पंदनं मोजतात. रक्तदाब पाहतात. इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो. ईसीजीमुळे हृदयाच्या ठोक्यांचा अंदाज येतो. या ठोक्यांमध्ये काही असामान्य लय आहे का ते दिसते. हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास तेही लक्षात येतं. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येतं. छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे. हृदयाच्या कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम काढला जातो.

तपासण्यात हृदयाची स्पंदनं असामान्य आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधं दिली जातात. रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. प्रत्येक रुग्णाची आणि त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचं नुकसान आणि अडथळ्यांचं प्रमाण, रुग्णाचं वय लक्षात घेऊन उपचारपद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. रक्त पातळ करण्याची इंजेक्शनही दिली जातात. कोरोनरी अ‍ॅँजियोप्लास्टी, फुग्याने रक्त वाहिन्यांचा अडथळा दूर करणं किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.
Learn why heart attacks are life-threatening!
थोडे नवीन जरा जुने