खजूर हे अतिशय पौष्टिक फळ

खजूर हेही अतिशय पौष्टिक फळ असून पूर्वापार ते सहारा वाळवंटात पोळीइतकेच महत्त्वाचे मानले गेले आहे. आता त्याचा वापर जगभर होतो. त्याचे गुणधर्म पिकलेल्या ताज्या आणि सुकवलेल्या दोन्ही प्रकारांत कायम राहतात हे विशेष.
पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे तेवढेच लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते. झाडावर पिकलेल्या खजुराची गोडी वेगळीच असते. मात्र तो लवकर आंबू लागतो. म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते.

माणसाने लागवडीस आणलेल्या प्राचीन फळांपैकी हे एक फळ आहे. मेसापोटेमियात सापडलेल्या ५००० वर्षापूर्वीच्या विटांवरील लिखाणात खजुराची लागवड करण्याविषयीच्या सूचना सापडतात, तर इजिप्तमधील स्मारकांवर खजुरांच्या झाडांची चित्रे कोरलेली आहेत.

बायबलमध्ये हे झाड व फळ यांचे गुण सांगणारे कित्येक उल्लेख आहेत. प्रेषित महंमद पैगंबर असे मानीत होते की, देवाने माणूस निर्माण केल्यावर उरलेल्या त्या खास मातीतून झाड निर्माण केले आहे.

खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया अगर पार्शियाचे आखात असावे, असे मानतात. आज जगातल्या प्रमुख पिकांत त्याची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन व अमेरिका इतक्या ठिकाणी याचे पीक घेतात. खजुरात शरीरास पोषक अशी द्रव्ये भरपूर आहेत. ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील साखर त्यातून मिळते.

» खजूर नुसता दुधाबरोबर घेतल्याने त्याचे पोषणमूल्य वाढते.

» खजूर हे पौष्टिकतेमुळे टॉनिक मानले गेले आहे.

» खजूर सहज पचत असल्याने शक्ती व उत्साह पुरवून तो रुग्णाची झीज लवकर भरून काढतो.

» खजूर घालून उकळलेले दूध मुलांना व आजारी व्यक्तींना विशेषत: आचके येत असल्यास गुणकारी ठरते.

» खजुरातील निकोटिनमुळे आतडय़ाच्या तक्रारींवर तो रामबाण ठरतो.

» मेटचिनकाफ या रशियन शास्त्रज्ञाच्या मते खजुराचा भरपूर वापर केल्याने आतडय़ातील अपायकारक जंतूंची वाढ रोखली जाऊन आटोक्यात राहते.

» खजूर हे सारक फळ आहे.

» दारू व तत्सम पदार्थाची नशा खजुरामुळे उतरते.

» दुबळय़ा हृदयासाठी खजूर चांगला आहे.

» लहान मुलांच्या मनगटाला खजूर कडे बनवून बांधावा. दात येताना त्याला तो चघळू द्यावा. यामुळे हिरडय़ा मजबूत होऊन दात ठिसूळ होत नाहीत.

» खजूर निवडताना खबरदारी घ्यावी. कारण सालीच्या चिकटपणामुळे त्यावर धूळ व रोगजंतू चिकटतात. नीट केलेला चांगल्या प्रतीचा खजूर घेऊन नेहमी धुऊनच तो वापरावा.
थोडे नवीन जरा जुने