हिवाळ्यात अशी घ्या गुडघेदुखीची काळजी
थंड हवामान आपल्या शरीराची गतिमानता बदलून टाकते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. गुडघ्याचा सांधा हा शरीराचे वजन पेलणा-या प्रमुख सांध्यांपैकी एक आहे. त्यामुळे बहुतेकांनी (विशेषत: वयस्करांनी) आयुष्यात कधी ना कधीतरी चालताना किंवा जिने चढता-उतरताना गुडघेदुखीचा अनुभव घेतलेलाच असतो. थंड हवामानात ही लक्षणे अधिक तीव्र होतात आणि दैनंदिन आयुष्यातील कामे करणेही कठीण होऊन बसते.
सांधेदुखी ही दुखापतीमुळे निर्माण होत असली किंवा संधीवातासारख्या विकाराचे ते लक्षण असले, तरी हिवाळ्यात अगदी निरोगी व्यक्तीलाही सांध्यांमध्ये (विशेषत: गुडघ्याच्या सांध्यात) काहीशा अनिश्चित, सतत सलणा-या वेदना जाणवू शकतात. या वेदनेचे आणि ताठरपणाचे नेमके कारण कळत नाही. मात्र, हिवाळ्यात शरीर उष्णता साठवून ठेवते आणि त्यामुळे हृदय आणि फुप्फुसांसारख्या केंद्रीय अवयवांकडे जास्तीत जास्त रक्तपुरवठा केला जातो. अशा प्रकारे सांध्यांना कमी रक्तपुरवठा होतो. आणखी एका गृहीतकानुसार, बाह्य वातावरणातील बदलांच्या दबावामुळे सांध्यांमध्ये दाहाच्या स्वरूपात प्रतिक्रिया निर्माण होते आणि रक्ताभिसरणातील बदलांमुळे तसेच मज्जातंतूची संवेदनशीलता वाढल्यामुळे सांध्यांना सूज येणे, वेदना होणे या समस्या जाणवतात.

हिवाळ्यातील गुडघ्याच्या सांध्यांतील वेदनांना प्रतिबंध करण्याची एक अशी पद्धत नाही. दिनक्रमात काही मूलभूत बदल केल्यास, तुम्ही हा ऋतू आरामात घालवू शकता. गरम कपडे नक्की घाला. दैनंदिन उपक्रम नेहमीप्रमाणे सुरू ठेवा. स्नायू व सांध्यांना पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी क्रियाशील राहणे खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे ताठरपणा व वेदना टाळण्यात मदत होईल. त्रास होत असेल, तर फार तीव्र स्वरूपाचे उपक्रम करू नका. पण, पूर्णपणे निष्क्रिय अजिबात होऊ नका. संधीवात किंवा प्रोस्थेटिक जॉइंट्सच्या रुग्णांनी त्यांचे फिजिओथेरपीस्ट/ऑथोर्पेडिक डॉक्टरांना भेटून त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे. याशिवाय तुम्ही मूलभूत क्वाड्रिसेप्स आणि हार्मस्ट्रिंग मजबूत करणारे व्यायाम करू शकता. हे व्यायाम तुम्हाला फिजिओथेरपीस्ट शिकवू शकतील. हिवाळ्यात गुडघ्याच्या सांध्याचे नुकसान किंवा दुखापत टाळण्यासाठी कोणताही व्यायाम प्रकार सुरू करण्यासाठी पुरेसे वॉर्म-अप करणे आणि स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे आहे. तत्काळ वेदनामुक्तीसाठी तुम्ही हीट पॅक्स वापरू शकता. पण, शरीराचा तो भाग भाजणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे उपाय दिवसातून काही वेळा केले जाऊ शकतात. गरम पाण्याने आंघोळ करा आणि काही मूलभूत तंत्रे वापरून मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूतील ताठरपणा कमी होऊन हालचाल करणे सोपे होते. मात्र, शरीराला काही मर्यादा आहेत; त्यामुळे पुरेशी विश्रांती नक्की घ्या. गुडघ्याच्या सांध्यावर एका वेळी खूप ताण येऊ देऊ नका. सांध्यांना पुरेशी विश्रांती मिळत राहील अशा पद्धतीने तुमच्या कामांचे नियोजन करा.

कॅल्शिअम, जीवनसत्त्व डी-३ व जीवनसत्त्व बी-१२ यांच्या कमतरतेमुळेही हिवाळ्यात गुडघेदुखी वाढू शकते. त्यामुळे दरवर्षी या चाचण्या करवून घेऊन या घटकांची पातळी पुरेशी राखा.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा व शरीर सुदृढ करण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे समतोल आहार घेणे त्याचप्रमाणे रक्ताभिसरणास मदत करणा-या व दाह कमी करणा-या काही नैसर्गिक उपचारपद्धती वापरणे.

आले : दाह कमी करणारा तसेच परिघातील (पेरिफेरल) रक्तप्रवाहाला चालना देणारा पदार्थ. संधीवातासंबंधीच्या पॅथोलॉजीमध्ये आल्याचे अनेक फायदे दिसून आले आहेत.

गिंको बिलोबा ही वनस्पती व्हॅसोडिलेटरी अर्थात रक्तवाहिन्या रुंद करण्याच्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे.

काही प्रकारचे मासे आणि माशांपासून काढलेल्या तेलात ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ही अ‍ॅसिड्स अँटि-ऑक्सिडंट तसेच दाह कमी करण्याचे काम करून तेवढय़ा भागाची तसेच संपूर्ण शरीराची स्थिती बदलू शकतात.

सुवासिक तेले : नीलगिरी, विंटरग्रीन, रोझमेरी आणि शोमोमाईल ही तेले वेदना शमवण्यासाठी, स्नायू मोकळे करण्यासाठी तसेच निर्विषीकरणासाठी (डिटॉक्झिफिकेशन) केल्या जाणा-या मसाजसाठी वापरली जातात.थोडे नवीन जरा जुने