निरोगी राहण्यासाठी एकटेपणा करा दूर...


ज्या लोकांना विशिष्ट कारणांमुळे एकटे राहावे लागते ते लोक निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत. अशा स्थितीत लो बीपी (कमी रक्तदाब) ची शक्यता वाढते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. एकटेपणा अनेक आरोग्य समस्या आणि मानसिक आजारांसाठी जबाबदार ठरू शकतो. त्यामुळे मित्र किंवा नवीन लोकांशी संपर्क वाढवणे आवश्यक आहे. जाणून घेऊया एकटेपणा आरोग्यासाठी कसा घातक ठरू शकतो.

*एखाद्याशी न बोलणे किंवा संबंध न ठेवल्याने व्यक्तीमध्ये हीन भावना जागृत होते आणि त्याच्या आत्मविश्वासातही कमतरता येते. अशा पद्धतीने ती व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वालाच नुकसान पोहोचवते.

*एकटेपणा दूर करण्यासाठी अनेकजण धूम्रपान व अल्कोहोल यासारख्या वाईट सवयींच्या आहारी जातात, परंतु असे करणे हृदयासाठी घातक आहे. मित्रांचा सहवास अशा वाईट सवयींपासून दूर ठेवण्यास साहाय्यक ठरू शकतो.

*तणाव आणि चिंता यासारखे मानसिक आजार एकटेपणामुळेच होतात. अशावेळी व्यक्ती नकारात्मक विचारांमध्ये गुरफटून जातो. तसेच अशा स्थितीतच व्यक्तीच्या वर्तनात बदल दिसून येतात.

*एकटेपणा लो बीपीची समस्या वाढवू शकतो. कारण त्याच्याजवळ बोलण्यासाठी कुणीच नसते. तज्ज्ञांच्या मते आतल्या आत घुटमळणे किंवा आपल्या भावना व्यक्त न करू शकण्याच्या स्थितीतच व्यक्तीला लो बीपीची समस्या भेडसावते.

*एका संशोधनानुसार, जुने मित्र किंवा नवीन लोकांची भेट घेतली नाही तर त्याचा व्यक्तीच्या स्मरणशक्तीवरही परिणाम जाणवतो. एकटेपणामुळे स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. तज्ज्ञांच्या मते मेंदूची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी सामाजिक परीघ वाढवणे खूप आवश्यक आहे.

*वयोवृद्ध दांपत्यातील एकाचा मृत्यू झाल्यावर दुसरा जोडीदार तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अशावेळी मन रमण्यासाठी धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. यामुळे मन:शांती मिळेल आणि मेंदूत माजलेले विचारांचे काहूरही थांबेल.

*तज्ज्ञांच्या मते एकटे राहिल्यास व्यक्ती आपल्या खान-पानाकडे योग्य लक्ष देत नाही. यामुळे अशक्तपणा वाढतो आणि ती व्यक्ती अधिक आजारी राहते.

Take loneliness away to stay healthy
थोडे नवीन जरा जुने