अपयशी होण्यामागे 'ही" आहेत कारणे...


माणूस करंटा/अयशस्वी का होतो, समर्थ रामदास स्वामींनी अनेक ओव्यांमध्ये सांगितले आहे. त्यातील एक नमुना पाहू! ते म्हणतात –

विद्या नाही, बुद्धी नाही। विवेक नाही, साक्षेप नाही।
कुशलता नाही, व्याप नाही। म्हणोनि प्राणी करंटा।।

ते म्हणतात, यशस्वी व्हायचे असेल, तर स्वतःकडे काहीतरी हवे. शिक्षण हवे. अशिक्षित असलो, तरी बुद्धिमत्ता चांगली हवी. ते नाही, तर विवेक, विचारपूर्वक, न्याय्य, शुभ, सत्य वागायची सवय हवी. साक्षेप म्हणजे सावधपणा हवा, कौशल्य हवे, व्यवसायाचा व्याप वाढायला हवा. असे काहीच नसेल, तर माणूस अपयशी ठरतो. आळशीपणा, नुसती बडबड या साऱ्याचा समर्थांना अत्यंत राग आहे. खूप व अचूक प्रयत्न करावे, आपल्या कामाचे व व्यवसायाविषयीचे ज्ञान सतत ग्रहण करावे, प्रत्येक काम सकारात्मक दृष्टिकोनाने करावे, कामात एकरूप व एकाग्र असायला हवे, कामात तत्परता (Promptness) हवी, ‘बातें कम, काम ज्यादा’ हवे, अशी कार्यसंस्कृतीची शेकडो तत्त्वे समर्थांनी सांगितली आहेत. त्यातील काही तत्त्वे खालील ओव्यांत आहेत.

लहान थोर काम नाही। केल्या वेगळे होत नाही।
करंट्या सावध पाहीं। सदेव होसी।।

ते म्हणतात, करंट्या/ अयशस्वी माणसा, तू सावधपणे व तत्परतेने कामे केलीस तर ‘सदेव’ (यशस्वी) होशील.

केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।
यत्न तो देव जाणावा। अंतरी धारता बरे।।

प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य आहे, ‘प्रयत्न हाच परमेश्वर’ अशी मनाशी खूणगाठ बांधून सकारात्मक दृष्टीने काम केले, की यश मिळते, असे समर्थ सांगतात. आळसावर ते तुटून पडतात -

आळसे राहिला विचार। आळसे बुडाला आचार।
आळसे नव्हे पाठांतर। काही केल्या।।
आळसे नित्यनेम राहिला। आळसे अभ्यास बुडाला।।
आळसे आळस वाढला। असंभाव्य।।
जे ही उदंड कष्ट केले। ते भाग्य भोगून ठेले।
येर ते बोलतचि राहिले। करंटे जन।।

भरपूर कष्ट केले, त्यांनाच ‘भाग्यप्राप्ती’ झाली आहे व बडबड करीत राहिले व कृतिशून्य राहिले, ते सारे करंटे/अयशस्वी ठरले आहेत, हे समर्थ ठामपणे व थेट सांगतात.

व्यक्तिमत्त्व विकास :
हिमनग जसा समुद्राच्या पाण्यात सात अष्टमांश भाग असतो व दिसतो तो केवळ एक अष्टमांग भाग असतो, त्याप्रमाणे माणसाच्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा आतमधील व्यक्तिमत्त्व हा मोठा भाग आहे. हे व्यक्तिमत्त्व विकासातील आधुनिक तत्त्व समर्थांनी ३५० वर्षांपूर्वी सांगितले आहे. त्याला ते ‘अंतरंग शृंगारणे’ असे म्हणतात. ती ओवी पाहू -

चातुर्ये (शहाणपण/कौशल्य/चारित्र्य/गुण इत्यादी) शृंगारे अंतर।
वस्त्रे शृंगारे शरीर।
दोहीमध्ये कोण थोर। बरे पहा।।

‘आतला शृंगार’ महत्त्वाचा का बाहेरचा शृंगार महत्त्वाचा, यातील ‘जास्त महत्त्वाचे’ काय, असा आपल्यालाच सवाल करून ते अंतर्मुख करतात. अर्थात, ‘आतला शृंगार’ म्हणजे आतमध्ये सद्गुण, कौशल्य, हुशारी, शहाणपण, ज्ञान हे असणे जास्त महत्त्वाचे, हेच त्याचे उत्तर आहे. त्याच वेळी ते बाहेरच्या शृंगाराला अजिबात महत्त्व नाही, असे म्हणत नाहीत. हे पाहिल्यावर त्यांच्या अलौकिक/ सखोल अर्थाच्या ओव्यांचे अतिशय कौतुक वाटते व त्यांच्याविषयीच्या आदराने मस्तक झुकते.
विशेषतः विश्वसुंदरी स्पर्धा पाहताना समर्थांच्या या ओवीची आठवण येते. ती म्हणजे, पहिल्या ‘बाह्य सौंदर्य’ तपासणाऱ्या फेऱ्यांनंतर निवडल्या गेलेल्या स्त्रियांच्या अंतरंगाची/चातुर्याची/आतमधील सौंदर्याची अनेक तज्ज्ञ अनेकविध प्रश्न विचारून चाचणी घेतात आणि त्या स्त्रीची बुद्धिमत्ता, हजारजबाबीपणा, सामाजिक जाणीव, शहाणपण, विचारक्षमता, संवादाचे कौशल्य या गोष्टी तपासतात व त्यात यशस्वी होणाऱ्या स्त्रियांना अंतिम फेरीमध्ये स्थान मिळते. माझ्या प्रशिक्षण वर्गात मी नेहमी हे उदाहरण देऊन सांगतो, की ‘सौंदर्य स्पर्धांमध्येदेखील आतल्या सौंदर्याला एवढे महत्त्व दिले जाते, तर आपण कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत नाही. त्यामुळे आपल्याला ‘आतले सौंदर्य/गुणवत्ता’ याशिवाय पर्याय नाही!

व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक ओव्यांपैकी आणखी एक ओवी म्हणजे -

रूप लावण्य अभ्यासिता नये। सहजगुणास न चले उपाय।
काही तरी धरावी सोये। अगांतुक गुणांची।।

‘अगांतुक गुण’ म्हणजे प्रयत्नपूर्वक साध्य केलेले, बाहेरून आलेले (एक्स्टर्नल क्वालिटीज) गुण. समर्थ म्हणतात, की नैसर्गिक असलेल्या, जन्मत: असलेल्या गुणांना खूप मर्यादा आहेत, त्याला काही उपाय नाही. म्हणूनच गप्प न बसता अनेक गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात केले, तरच चांगला व्यक्तिमत्त्व विकास किंवा नेतृत्वविकास होतो. ‘Leadership are not born’ असाच संदेश समर्थांनी दिला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाला व्यक्तिविकास व नेतृत्वविकासाला भरपूर वाव आहे, असे सांगणारा हा आगळावेगळा संत आहे.

शेवटी समर्थांच्या भाषेत, सूत्रबद्ध रीतीने या लेखमालेचा समारोप करू या. समर्थांनी एका ओवीत व्यक्तिविकास व नेतृत्वविकासाचे रहस्य सांगितले आहे. स्वतःचे दोष/अवगुण ओळखून त्याचा त्याग करणे, ते सोडणे व अनेक उत्तम गुण समजावून घेऊन आपल्या जीवनात आत्मसात करणे, हेच ते रहस्य आहे व तरच आपल्या मनातील महत्त्वाकांक्षा/ईप्सित/ध्येय साध्य होते, असे ते खालील ओवीत म्हणतात.

या कारणे अवगुण त्यागावे। उत्तम गुण समजोन घ्यावें
तेणे मनासारिखे फावे। सकळ काही।।

तुमच्या सर्व महत्त्वाकांक्षा, मनातील सर्व स्वप्ने, स्वप्नांना लागणारे गुण प्राप्त करून व त्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या अवगुणांचा त्याग करूनच, प्रत्यक्षात उतरविणे शक्य आहे. हे अवगुण/दोष ओळखण्यासाठी एक महत्त्वाची सवय (Super Habit) आपल्यात हवी ती म्हणजे स्वतःची अंतरंग परीक्षा. ती नसेल, तर आपण करंटे/अयशस्वी होतो, असे ते म्हणतात.

लोक नाना परीक्षा जाणती। अंतर परीक्षा नेणती।
तेणे प्राणी करंटे होती। संदेह नाही।

The reasons for failure are "these"
थोडे नवीन जरा जुने