सफरचंदात असे काय आहे ? सफरचंदाच्या सेवनाने होतात 'हे' आरोग्यवर्धक बदल
‘अँन अँपल अ डे, कीप्स अ डॉक्टर अवे’ ही इंग्रजीतील म्हण सर्वांना माहीत असेल. मात्र, सफरचंदात असे काय आहे की ज्यामुळे ही म्हण तयार झाली? खरे म्हणजे सफरचंदात मोठय़ा प्रमाणात असलेले अँटिऑक्सिडंट्स या फळाला विशेष बनवतात.

2004 मध्ये यूएसडीएच्या शास्त्रज्ञांनी अँटिऑक्सिडंट्स युक्त 100 खाद्य पदार्थांची तपासणी केली. त्यामध्ये सफरचंद 12व्या क्रमांकावर होते.

काय आहे अँटिऑक्सिडंट्स?

आजारांशी लढण्याची ताकद ठेवणार्‍या कंपाउंड्सला अँटिऑक्सिडंट्स असे म्हटले जाते. हे कंपाउंड्स शरीरात ऑक्सिजन कमतरतेमुळे होणारी इजा रोखतात आणि झालेले नुकसानही भरून काढतात. सफरचंदात असलेले पेक्टिन नावाचे फायबर आरोग्यासाठी अनेक बाबतीत चांगले आहे.


दात राहतात निरोगी

दररोज एका संफरचंदाचे सेवन केल्याने तोंडात अधिक लाळ तयार होते. यामुळे बॅक्टेरियाची उत्पत्ती होत नाही आणि दात किडण्याची शक्यताही खूप कमी राहते.


मलावरोध बरा होतो

तुम्हाला मलावरोध किंवा अतिसाराचा त्रास होत असेल तर सफरचंदात आढळून येणारे फायबर दोन्ही आजारांमध्ये खूप फायदेशीर ठरतात.


आजारांपासून बचाव

दररोज सफरचंदाचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करता येतो.

कर्करोग :

अमेरिकन असोसिएशन फॉर कँसर रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या मते, दररोज सफरचंदाचे सेवन केल्याने पॅनक्रियाटिक कँसर होण्याचा धोका 23 टक्क्यांपर्यंत कमी होतो.


मधुमेह :

ज्या महिला दररोज एक सफरचंद खातात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 28 टक्क्यांपर्यंत कमी होते, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


मोतिबिंदू :

जे लोक नियमितपणे सफरचंदासारख्या भरपूर अँटिऑक्सिडंट्स असलेल्या फळांचे सेवन करतात त्यांना मोतिबिंदू होण्याची शक्यता 10-15 टक्क्यांपर्यंत कमी राहते, असे दीर्घ काळ चाललेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

दररोज सफरचंदाचा रस घेतल्याने अल्झायर्मस (स्मृतिभ्रंश) होण्याचा धोका खूप कमी होत असल्याचे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच सफरचंदाचा रस मेंदूच्या एजिंग प्रोसेसलादेखील मंद करतो.थोडे नवीन जरा जुने