शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय कराल?


परदेशी बनावटीची आइस्क्रीम्स, केक, बिस्किटं, चोको-बार, चॉकलेट्स, टॉफीज ही महागडी तसंच परदेशी खाद्यपदार्थ खाणं स्टेट्स सिम्बॉल ठरत आहे. मात्र हा स्टेट्स सिम्बॉलचा माज शरीरावर परिणाम करतो. तो ही इतका की, शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण घटतं. हिमोग्लोबीनमध्ये असणारा लोह हा घटक शरीराच्या जडणघडणीसाठी फारच महत्त्वाचा असतो.
रंजनची आणि माझी ओळख गेल्या दहा वर्षापासूनची आहे. तो परदेशस्थ अनिवासी नागरिक आहे. दोन ते तीन महिन्यांनी तो भारतात येत असतो. इथे मुंबईत येताना तो त्याच्या सात वर्षाच्या लेकीसाठी इंपोर्टेड चॉकलेट्स, गोळया, विविध बिस्किटं आणतो.

हा सर्व खुराक तिला दोन ते तीन महिने पुरे. खाऊ संपेपर्यंत डॅडी येण्याची वेळ झालेली असे. परदेशी बनावटीची आइस्क्रीम्स, केक, बिस्किटं, चोको-बार, चॉकलेट्स, टॉफीज यांसारखे महागडे पदार्थ खाणं हे माझ्या मित्राला स्टेट्स सिम्बॉल वाटे. त्याची मुलगी पिण्यासाठी पाण्याऐवजी ‘सॉफ्ट ड्रिंक्स’, ‘कोल्ड ड्रिंक्स’चा वापर करे. परिणामी त्या मुलीचं हिमोग्लोबीन ९ वरून ७ वर आलं.

चेहरा निस्तेज होऊन वारंवार सर्दी, खोकला झाला. त्यानंतर तिला वारंवार तापही येऊ लागला. रंजनने तिला मोठया विश्वासाने माझ्याकडे आणलं. त्याला स्पष्टच सांगितलं, ‘‘तिचं श्रीमंती तसंच फॅशनेबल कचरा अन्न बंद करावं लागेल.’’ तोही मग तयार झाला. मग मी तिला दिवसातून एक ते चार वेळा सुप्स, हिरव्या पालेभाज्या जेवणातून वेगवेगळय़ा पद्धतीने देण्यास सांगितलं. त्याचबरोबर रोज न विसरता उसाचा रस (लिंबू न पिळता द्यायला सांगितला.

लिंबू पिळल्यामुळे लोहामधील फेरसंचं क्षणात फेरीक होऊन जातं.) पिण्यास सांगितला. साधारण ४ महिन्यांत या मुलीचं हिमोग्लोबीन १४ पर्यंत आलं. त्यानंतर तिची रोगप्रतिकारक शक्ती आपोआपच सुधारली. त्यामुळे तिच्यातील रोगकारक लक्षणं आपसूकच नाहीशी झाली. तिच्या वडिलांनी मग परदेशातून कचरा अन्न न आणता, सुका मेवा, उत्तम काळा खजूर तसंच परदेशी सुकी फळं आणण्यास सुरुवात केली.

लोहकमतरतेमुळे होणारे आजार :


थकवा, आळस, निरुत्साह, तोंड आणि ओठ सोलवटणे, गिळण्यास त्रास होणं, पोटाचे विकार, अवयवास बधिरता येणं, उत्सर्जन संस्थेचे दोष, हृदयाची धडधड वाढणं, त्वचा निस्तेज होऊन निक्रिय होणं, नखं अवाजवी पातळ होणं.

लोह जसं शरीरास चांगलं तसं अतिरिक्त लोहाचं प्रमाण शरीरावर परिणाम करतं. शरीरात लोहाचं प्रमाण आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास त्वचेवर रंगबिरंगी डाग येतात. यकृताचं कार्य बिघडतं. स्वादुपिंडात फायब्रॉटिक वाढ होऊन त्यातून मधुमेह होतो.

लोहाची कमतरता जाणवल्यास पुढील आहार घ्यावा :

फळं : उसाचा रस (लिंबू न पिळता), ब्लू बेरीज, रास बेरीज, आवळा, सुका मेवा, जरदाळू, सफरचंद, पेर, आलुबुखार, केळं, अंजीर.

गोड पदार्थ : रासायनिक गूळ, काकवी.

भाज्या : सर्व हिरवा भाजीपाला, वाटाणा, शेंगदाणा, ब्रोकोली, कमलकंद, फुलकोबीचा पाला, पार्सली (चायनीज भाजी), बीट, बीटची पानं, गाजराची पानं, मुळय़ाची पानं

कच्चे आणि शिजवून खाण्यायोग्य पदार्थ : यीस्ट, बटाटा, मसूर, घरगुती चीज, गव्हांकूर, तांदूळ, ओट्स, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, चुरमुरे, विविध प्रकारच्या लाह्या, केळफूल.

What will you do to increase the iron content in the body?
थोडे नवीन जरा जुने