मन शांती मिळवण्यासाठी करा "हा" योगा,सोबतच तणावही कमी होईल...!


तुम्हाला हसायचंच आहे आणि त्या हसण्याचं कारण काहीच नाही हे सत्य स्वीकारण्याची गरज आहे. हे सत्य स्वीकारलं तरच तुम्ही हसू शकता.

प्रथम तुम्ही तुमच्या पोटाकडे लक्ष द्यावं आणि होऽ हो असं हसावं.
आता तुमच्या छातीकडे लक्ष केंद्रित करून हाऽ हाऽ असं हसावं.
श्वास खालीवर करत होऽ होऽ हाऽ हाऽ होऽ होऽ असं हसावं.
तणाव कमी करण्यासाठी डोक्याला दोन्ही बाजुने पकडा आणि मनातल्या मनात हीऽ हीऽ हीऽ असं हसावं.

हात आता छातीवर ठेऊन जोर जोरात हाऽ हाऽ हाऽ असं हसावं.
पुन्हा हात पोटावर ठेऊन श्वास आत घेत होऽ होऽ होऽ असं हसावं.
सगळं लक्ष पायांच्या तळव्यांवर केंद्रित करून हुऽ हुऽ हुऽ असं हसावं.
शरीर जमिनीच्या दिशेने वाकवून म्हणजेच कमरेत वाका. अगदी ओणवं उभं राहतो तसं राहून हाऽ हाऽ हाऽ हाऽ असं हसा. काही वेळ करावं.
आरशात स्वत:ला बघून हसा. यात तुम्ही तुमच्याच डोळ्यांत बघून हसत राहावं.

काही मिनिटांसाठी हात सरळ वर करून छातीवर लक्ष केंद्रित करा आणि हाऽ हाऽ हाऽ हाऽ असं हसावं.

हे जग खूप सुंदर आहे आणि या जगातील सगळी माणसं सुखी आणि खूश आहेत त्यात स्वत:चाही विचार करा आणि शांतपणे हसावं.
या योगाची शेवटची स्थिती म्हणजे डोळे बंद करून काही मिनिटं ॐ(ओम) असं म्हणावं.

या योगाने तुम्हाला खूप मन शांती मिळेल तसंच तणाव कमी होईल.
खरं तर हे वाचल्यावरच तुम्हाला हसायला आलं असेल. हास्ययोगाचे परिणाम हे सकारात्मकच असतात हे लक्षात ठेवा.


फायदे -

हसण्याने मन नेहमी प्रसन्न राहतं.शरीरातील सर्व अवयवांच्या पेशींना हास्य तरंग प्राप्त झाल्याने शरीराला ऊर्जा मिळते.हास्ययोगाने शरीराला व्यायाम तर मिळतोच तसंच रक्तभिसरण चांगलं होतं.

शरीराला पोषक असणा-या अनेक ग्रंथींची सक्रिय होतात. तसंच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

हास्ययोगामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

हास्य योगाचे हे मुख्य फायदे आहेतच पण त्याचे आणखीनही बरेच फायदे आहेत. हसण्याने केवळ छोटे-मोठे आजारच नव्हे तर आयुष्यातील नकारात्मक दृष्टिकोन झटकून टाकला जातो आणि आयुष्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागतो. हास्ययोगामुळे आपल्या स्नायुंवरही मोठय़ा प्रमाणात परिणाम होतो. ज्यांना अर्धागवायू झाला आहे. त्यांनी हास्ययोग हमखास करावा. 

अर्धागवायूने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना औषधांबरोबर हास्ययोगाचा फायदा होतो. कारण मांस, मज्जा अस्थिधातू यांना व्यायाम आणि प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाल्याने त्यात लवचिकता येते. आपल्या छातीचे, पोटाचे, श्वासपटलाचे स्नायू मजबूत होतात. तसंच कंबर, पाठ, डोळे यांनाही व्यायाम मिळतो. दिवसातून किमान एक मिनिट तरी मनमोकळेपणाने हसावे, त्याने तुमचे स्वास्थ्य चांगले राहते. पावसाळ्यात जॉगिंग करायला वेळ मिळाला नाही किंवा एरोबीक क्लासला जायला मिळालं नाही तरी घरच्या घरी हास्ययोग करता येतो. मनमोकळं हसणं हे १० ते १५ मिनिटांच्या ऐरोबीक आणि जॉगिंगच्या बरोबरीचंच आहे. 

ज्यांना स्पाँडिलायटिसपासून सुटका हवी असेल त्यांनी हास्ययोग करावाच. प्राणवायूंचा पुरवठा पेशीतील हाडांपर्यंत पोहोचल्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असणा-यांनाही त्याचा निश्चितच फायदा होतो. हसल्यामुळे स्वरयंत्राला एका सेकंदाला जवळपास २१० वेळा कंपने मिळाल्यामुळे आवाज सुधारतो आणि गळ्याच्या ग्रंथींचे कार्य सुधारते. 

ज्यांना थायरॉइडचा त्रास असतो, त्यांना कोणते उपाय करावेत अशी चिंता असते. अशांनी दिवसातून काही वेळ मनमोकळेपणाने हसावं. कारण हसण्यामुळे थॉयरॉइड ग्रंथींवर दाब पडत असल्याने या ग्रंथींपासून निर्माण होणा-या टी थ्री, टी फोर, टीएसएच या हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. 

हास्ययोगाचे असे अनेक फायदे आहेत आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त पद्धतशीरपणे कसं हसायचं असतं हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
थोडे नवीन जरा जुने