धक्कादायक ! डास पळविणाऱ्या कॉईल जाळल्यामुळे माणूस दररोज १०० सिगारेट ओढण्याइतका धूर स्वत:च्या शरीरात घेतो


डास पळविण्यासाठी सामान्य माणूस दररोज १०० सिगारेट ओढण्याइतका धूर स्वत:च्या शरीरात घेत असल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. डास पळविणाऱ्या कॉईल जाळताना दरवाजे-खिडक्या बंद केल्यामुळे हा प्रकार घडतो. यामुळे काळा दमा हा आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. काळा दमा हा आजार अतिशय हलक्या पावलाने शरीरात प्रवेश करत असल्याने त्याच्या ९५ टक्के रुग्णांचे निदानच होत नसल्याचे चेस्ट रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

घरातील विविध उपकरणांतून निघणारा धूर हा नकळत व्यक्तीच्या फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसाची श्वसन क्षमता कमीकमी होत जाते. असे वारंवार झाल्यास ही क्षमता खूपच खालावते आणि व्यक्तीला श्वसनास मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

डासांपासून बचाव करण्यासाठी घरात जाळली जाणारी कॉईल तसेच चूल, धूप किंवा देवापुढे लावली जाणारी अगरबत्ती यांचा धूर हा आरोग्यासाठी हानिकारक असतो. मात्र, याबाबत आपल्याकडे जागृती नसल्याने हा आजार झालेला लक्षात येत नसल्याचे चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले.

२०१०मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार काळा दमा हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले होते. राज्यात सिगारेट ओढण्याचे प्रमाण केवळ १७ टक्के असूनही काळा दमा होणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे लक्षात आले आहे.

याबरोबरच पॅसिव्ह स्मोकींगमुळेही काळा दमा होण्याच्या प्रमाणात वाढ होते. सिगारेट ओढणाऱ्यांच्या घरातील अनेकांना अस्थमा किंवा दमा असल्याचे काही संशोधनातून समोर आले असल्याचेही डॉ. साळवी यांनी सांगितले. त्यामुळे क्षयरोगानंतर काळा दमा हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत घराघरांत जनजागृती होणे आवश्यक असून सरकारनेही त्यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा येत्या काळात हे कारण मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरण्याची शक्यता आहे.

हा धूर अतिप्रमाणात शरीरात गेल्याने फुफ्फुसे निकामी होतात. एक व्यक्ती साधारणत: दिवसातूीन १० हजार लिटर हवा शरीरात घेते. यामध्ये वायू प्रदूषण, घरातील गोष्टींमुळे होणारे प्रदूषण, फटाके अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये फुफ्फुसांबरोबरच व्यक्तीचे हृदयही बाधित होते. त्यामुळे हृदयाचे विकार होण्याचीही शक्यता असते.

संस्थेने केलेल्या आणखी एका सर्वेक्षणानुसार ६० टक्के लोक दारे-खिडक्या बंद करुन कॉईल जाळत असल्याने श्वसनामुळे व्यक्तीच्या शरीरात धूर जातो. यामुळे एका रात्रीत १०० सिगारेट इतका धूर शरीरात जातो.
Shocking! Due to the burning of mosquito coils, man consumes as much cigarette smoke every day as he can.
थोडे नवीन जरा जुने