अबब ! शेतकऱ्याची विहीर चोरीला


हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव शिवारातून विहीर चोरीला गेल्याची तक्रार एका शेतकऱ्याने औंढा नागनाथ पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या शेतकऱ्याने संशय व्यक्त केला आहे. या अजब तक्रारीमुळे पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासन चक्रावून गेले आहे. 

येहळेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर सोळंके यांचे सर्व्हे नं. १३६ मध्ये अडीच एकर शेत आहे. २८ सप्टेंबर २०१८ मध्ये वीज कंपनीचे अभियंता अश्विनीकुमार मेश्राम, कर्मचारी अमोल थोरात यांच्या पथकाने ज्ञानेश्वर सोळंके यांनी कृषी पंपासाठी आकडा टाकून अनधिकृतरीत्या वीज घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी औंढा पोलिसांनी त्यांना अटक करून वसमत न्यायालयात हजर केले.

६ फेब्रुवारी रोजी जामीन झाला. या प्रकरणात औंढा पोलिसांनी १ ऑक्टोबर २०१९ रोजी वसमत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणात सोळंके यांनी औंढा पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडे विहीर चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. शेतात विहीर नसताना वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आकडा टाकून वीज घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 त्यामुळे शेतात विहीर आहे हे त्यांना माहिती आहे, मात्र मला अद्यापही ती सापडलेली नाही. त्यामुळे माझी विहीर वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व दोन पंचांनी चोरून नेली असून ती शोधून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतात जुनी विहीर असेल तर नवीन विहीर मंजूर होत नाही.

मात्र मला औंढा पंचायत समितीने रोहयोतून विहीर मंजूर केली आहे, असेही शेतकऱ्याचे म्हणने आहे. तर विहीर होती म्हणूनच कारवाई केल्याचे अभियंता अश्विनीकुमार मेश्राम यांचे म्हणने आहे.
थोडे नवीन जरा जुने