भारतीय लोकप्रशासन संस्थेकडून १४ फेब्रुवारी रोजी बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानाचे आयोजन

भारतीय लोकप्रशासन संस्थेकडून १४ फेब्रुवारी रोजी बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानाचे आयोजन

मुंबई: भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्यावतीने ‘बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यान’अंतर्गत ‘द इव्हॉल्विंग पॅराडाइम ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्रा सिन्स इंडिपेन्डन्स’ या विषयावर निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या व्याख्यानाचे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालय विस्तार इमारत, ६ वा मजला येथील परिषद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त तथा भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्री.सुकथनकर हे राज्याचे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1956 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र शासनामध्ये नगरविकास विभागाचे केंद्रीय सचिव म्हणून काम केले आहे. राज्य शासनामध्ये शालेय शिक्षण, उद्योग, महसूल आदी विभागांचे सचिव, मुंबईचे महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त म्हणून जबाबदारी बजावली आहे. राज्य नियोजन मंडळाचे सदस्य तसेच पहिल्या राज्य वित्त आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. केंद्र व राज्यातील कराचा वाटा, राष्ट्रीय समुद्रतटीय नियमन क्षेत्र (नॅशनल-सीआरझेड) चा परिणामांचा अभ्यास करुन राष्ट्रीय किनारपट्टी धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्य शासनाने श्री. सुकथनकर यांना ‘आदिवासी सेवक पुरस्काराने’ सन्मानित केले आहे.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून अधिकाधिक नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महा-रेरा चे सदस्य तथा भारतीय लोक प्रशासन संस्थेचे मानद सचिव डॉ. विजय सतबीर सिंग यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने