प्रेयसीच्या हत्येच्या प्रयत्नात झाला त्याचाच रेल्वे अपघातात मृत्यू


मुंबई : धुळे येथून फिरण्यासाठी म्हणून प्रेयसीला मुंबईत आणून तिचा रेल्वे ट्रॅकमध्ये गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा मृत्यू रेल्वेखाली झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी या संशयास्पद घटनेचा तपास पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले.

यातील मृत इसम व त्याच्या सोबत असलेली महिला हे दोघेही धुळे येथील राहणारे असून त्या महिलेची मृत व्यक्तीशी कर्जाच्या निमित्ताने ओळख झाली होती. ओळखीतून पुढे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. हे जोडपे धुळ्याहून मुंबईला फिरण्यासाठी आले होते. धुळ्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेला बसवण्याच्या बहाण्याने तिला मृत इसमाने वांद्रे येथून ट्रेन पकडून माटुंगा येथे उतरले.

दादर टर्मिनसहून ट्रेन पकडण्यासाठी आपण रुळावरून चालत जाऊ असे सांगत दोघे दादर-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळावरून चालू लागले. एका निर्जन टप्प्यात आल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना महिला तिची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. 

अखेर तिची हालचाल थांबल्यानंतर ती मृत झाल्याचे समझत तो तिचे सामान उचलून रुळावरून पळत सुटला. पण त्याचवेळी समोरून ट्रेन येतेय, हे त्याच्या लक्षात आले नाही व ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर निपचित पडलेली महिला प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळत सुटली. रेल्वे पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मृत व्यक्ती त्या महिलेसोबत रेल्वे रुळावरून जात असताना दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनेचा काहीच पुरावा पोलिसांकडे नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
थोडे नवीन जरा जुने