ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नसतं, अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला
सांगली : “ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नसतं. याचं भान मुनगंटीवार यांनी ठेवावं”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला . सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपदी असताना केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला
आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिधीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगलीच्या तासगावात आले होते . इथे आबांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे. तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका असणार नाही. यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देणे गरजेचे नाही”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर घणाघात केला.

“सुधीर मुंगनटीवार हे मंत्री असताना म्हणाले होते की, आबा हयात नाहीत म्हणून आमचे (भाजप) सरकार आले. मात्र, मी मुनगंटीवार यांना सांगतो, आज आबा जरी नसले, तरी आमच्यासोबत आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं आहे.

ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नसतं. याचं भान मुनगंटीवार यांनी ठेवावं. जोपर्यंत बहुमत आमच्यासोबत आहे. तोपर्यंत आमच्या सरकारला धोका नाही, हे भाजप नेत्यांनी चांगल्याप्रकारे समजून घ्यावे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने