अखेर इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरीअहमदनगर :  “सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला केल्यास मुलगी होते’, असे वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मंगळवारी अखेर एका पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा समाज माध्यमांतून विपर्यास केला असल्याचे महाराजांनी म्हटले आहे. 

आपल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निवृत्ती महाराज देशमुख तथा इंदुरीकर महाराज चर्चेत आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी महाराजांना यासंदर्भात नोटीसही बजावली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेदेखील इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निवेदन सादर केले आहे.

पत्रकात महाराज म्हणतात, पत्रकात इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे की, “गेल्या आठ दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात वादळ उठले आहे. डॉक्टर, शिक्षक, वकील, महिला भगिनी, वारकरी, कीर्तनकार अशा सर्वांना उद्देशून हे पत्रक आहे. माझ्या कीर्तनरूपी सेवेतून संततीबाबत जे विधान केले गेले आहे, त्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

 मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. गेल्या २६ वर्षांतील कीर्तनरूपी सेवेतून रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर मी प्रहार केला आहे. कौटुंबिक नात्यांना महत्त्व दिले. महिलांना दुखावण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. तरीही कोणी या वाक्यामुळे दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. असेच प्रेम राहू द्या’, असे आवाहनही त्यांनी या पत्रकात केले आहे.
थोडे नवीन जरा जुने