इंदुरीकर महाराजांना 'ते' वक्तव्य भोवणार?अहमदनगर : एका कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.

'सम तिथीस स्त्री संग केल्यास पुत्रप्राप्ती होते', तसेच 'विषम तिथीस केल्यास कन्याप्राप्ती होते' असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत सत्यता तपासून पुरावे हाती आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत घेतला आहे.

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या या विधानाबाबत समिती बैठकीत चर्चा करण्यात आली. या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वक्तव्यावरून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत आहे का, हे देखील तपासले जाणार आहे. तसेच यामध्ये सत्यता आहे का हे आधी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुरावे हाती आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. अद्याप मात्र याबाबत कोणतीही नोटीस बजावलेली नाही. असे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने