मुंबईकरांसाठी उत्तम, आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविणार - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबईकरांसाठी उत्तम, आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविणार - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरमुंबई : मुंबईतील कामा रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय व जे.जे. रुग्णालयातील समस्या सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. मुंबईतील वैद्यकीय सेवा समस्यांबाबत बैठक घेण्यात आली.

श्री.पाटील-यड्रावकर म्हणाले, मुंबईमधील रुग्णालयात दर्जेदार उपकरणे वापरण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत. आय.सी.यु. बेडची संख्या वाढविण्यात येईल, अपघात विभागात डॉक्टरांची उपलब्धता करुन देण्यात येईल, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्यात येईल, युरॉलॉजी विभाग, सी.टी.स्कॅन सेवा, एम.आर.आय. तसेच कँन्सर पीडितांसाठी पेट स्कॅन सेवा पुरविण्याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चारही रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. सिनिअर डॉक्टरांची संख्या जेथे कमी असेल तेथे वाढ करण्यात येईल. मुंबईतील चारही रुग्णालयातील समस्या व अडचणी सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहाने, जे.जे.रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मधुकर गायकवाड आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने