पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुनर्वापर करा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहनमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक संपन्न

मुंबई : जगभरात भारत, चीन, अमेरिका हे तीन देश पाण्याचा सर्वाधिक वापर करतात त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितका पाणीसाठा उपलब्ध आहे त्यातला ५० % साठा फक्त ७ देश वापरतात. त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील जनतेने पाण्याचा योग्य वापर करायला हवा. येत्या काळात महाराष्ट्र शासन वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर (recycling) कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. यावेळी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.बक्षी तसेच सदस्य व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पाण्याच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला व त्यावर चर्चा झाली.

मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमधील इमारतींमध्येही पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना विकासकांना दिल्या जातील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. येत्या काळात विकासकांना तशा सूचनाही द्या असेही ते म्हणाले. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी होऊन महाराष्ट्रातील पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

बाथरूम, टॉयलेट्समध्ये ठराविक क्षमतेचे शॉवर, फ्लश

ज्याप्रमाणे घरात ठराविक क्षमतेची वीज उपकरणे वापरली जातात त्याचप्रमाणे राज्यात ठराविक क्षमतेचे जल उपक्रम आणता येतील का, जल उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उपकरणे बनतानाच तशी उपकरणे बनवण्याचे निर्देश द्या, असे निर्देश जयंत पाटील यांनी दिले.

पाणी चोरीविरोधात कायदा यावा

विविध मार्गाने पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्रभरातून येत आहेत. पाणी चोरीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. येत्या काळात पाणी चोरीविरोधात कायदा आणण्याबाबत विचार व्हावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने