श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक

श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठकमुंबई : श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्मिती होणारे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर व आळंदीच्या धर्तीवर श्रीक्षेत्र माहूरगडचा विकास आराखडा सादर करावा, असेही श्री. पटोले यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा यामध्ये रेणुकामाता मंदिर, दत्त शिखर, अनुसयामाता मंदिर यासह 11 ठिकाणाचा समावेश आहे. त्यामध्ये धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि पायाभूत सुविधाचा समावेश आहे. या आराखड्यामध्ये समावेश असलेले रोपवे या कामाकरिता केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत माहूर येथील पर्यटक सुविधा केंद्र इमारत ते श्री रेणूका देवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया देवी मंदिरास जोडणाऱ्या रोपवे करिता रेणूका देवी मंदिर येथे लिफ्टसह फूटओवर ब्रिज या कामाकरिता निविदास्तरावर काम सुरु आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

श्रीक्षेत्र माहुरगडाकरिता 2016-17 मध्ये 216 कोटी रुपयांची तरतूद होती. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीकरिता लागणारी रक्कम 2 वर्षात टप्याटप्याने घेऊन हा आराखडा पूर्ण व्हावा, असे श्री.पटोले यांनी यावेळी सांगितले.

माहूर येथील विकास आराखडा तयार करीत असताना पुरातत्व विभागाने मंदिराचा विकास आराखडा तयार करुन सादर करावा. तसेच पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार ही कामे करण्यात यावीत.

माहूर येथे उन्हाळ्यात मोठी जत्रा भरते मंदिरामध्ये मोठी गर्दी होते. त्याठिकाणी व्हेंटीलेशनसाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन त्याठिकाणी एसी बसविण्यात यावा असे निर्देश यावेळी देण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितिन करिर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी.जोशी, अधीक्षक अभियंता ए.टी. धोंडगे, कार्यकारी अभियंता एस.व्ही. कोटावाड पुरातत्व विभागाचे संचालक, तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सहायक संचालक, औरंगाबाद अजित खंदारे याच्यासह संबंधित विभागातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने