सेन्सेक्सची ९१७ अंक उसळी


मुंबई : जागतिक बाजारात स्थैर्य येण्याची शक्यता बळावल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये लक्षणीय तेजीची नोंद झाली. बीएसई सेन्सेक्स ९१७.०७ अंक (२.३० टक्के) उसळून ४०७८९.३८ पातळीवर बंद झाला. तसेच एनएसई निफ्टी देखील २७१.७५ अंक (२.३२ टक्के) उसळून ११९७९.६५ पातळीवर बंद झाला.

मंगळवारच्या तेजीमध्ये आयटीसी, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर ७.९७ टक्क्यांनी झळाळून निघाले. याउलट बजाज ऑटो आणि एचयूएल कंपन्यांचे शेअर कोसळले. 

अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर खनिज तेलाचा दर घसरल्यामुळे जागतिक बाजारांमध्ये स्थैर्य येऊ लागले आहे. अशा वेळी देशातील निर्मिती उद्योगाचा विकास निर्देशांक देखील विक्रमी पातळीने उंचावला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि मंगळवारी त्यांनी जोरदार खरेदी केली. केवळ भारतातीलच नव्हे तर शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सेओल येथील शेअर बाजारात देखील मंगळवारी तेजीची नोंद झाली. तसेच युरोपमधील शेअर बाजारांची सुरुवात देखील मंगळवारी तेजीनेच झाली. 

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाप्रमाणे अधिक व्यापक असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात देखील अनुक्रमे १.३७ टक्का आणि १.२९ टक्का तेजी आली. कंझ्युमर ज्युरेबल्स क्षेत्राच्या निर्देशांकात मंगळवारी सर्वाधिक ३.७५ टक्के तेजी आली. तसेच मेटल निर्देशांकात ३.२९ टक्के, तर ऑईल अँड गॅस निर्देशांकात ३.०७ टक्के तेजी आली. त्याखालोखाल एनर्जी निर्देशांकात ३.०२ टक्के, तर पीएसयू निर्देशांकात २.७८ टक्के तेजी आली. तसेच रियाल्टी निर्देशांकात २.७३ टक्के तेजी आली. त्यापाठोपाठ पॉवर निर्देशांकात २.१७ टक्के तेजी आली. तसेच बँकेक्स निर्देशांकात २ टक्के तेजी आली. तसेच आयटी व टेक्नॉलॉजी निर्देशांकात अनुक्रमे १.५९ टक्का व १.५१ टक्का तेजी आली. तर कॅपिटल गुड्स निर्देशांकात १.३५ टक्का तर ऑटो निर्देशांकात १.३४ टक्के तेजी आली. एफएमसीजी निर्देशांकातही मंगळवारी १ टक्का तेजी आली.
थोडे नवीन जरा जुने