'आप'ची दर्जेदार शिक्षण, आरोग्याची हमी


नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी आपला विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा जारी केला. त्यात आपने दिल्लीकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी व २४ तास वीज पुरवठ्यासह सफाई कर्मचाऱ्यांचा कामावर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान दिले आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी येत्या रविवारी मतदान होणार असून, तद्नंतर ११ तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'आप'ने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तथा अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा निवडणूक जाहीरनामा जारी केला. केजरीवालांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपला बुधवारपर्यंत आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान दिले.

 'भाजपने बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यास आपली त्यांच्याशी कोणत्याही मुद्यावर जाहीर वादविवाद करण्याची तयारी आहे', असे ते म्हणाले. प्रस्तुत जाहीरनाम्यात 'आप'ने दिल्लीच्या नागरिकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य, पिण्याचे स्वच्छ पाणी, २४ तास वीज पुरवठा, स्वस्त धान्याचा घरपोच पुरवठा तथा १० लाख ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. 
'आप सरकारने २०१५ मध्ये दिल्ली जनलोकपाल विधेयक मंजूर केले होते. हे विधेयक सध्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. निवडणुकीनंतर दिल्लीत आपचे सरकार आल्यास हे विधेयक मंजूर करवून घेण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला जाईल.
थोडे नवीन जरा जुने