सदैव पुढे जाण्याचा संकल्प करून चांगली संधी मिळवा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

सदैव पुढे जाण्याचा संकल्प करून चांगली संधी मिळवा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेमुंबई : प्रामाणिकता आणि आत्मविश्वास असेल आणि पुढे जाण्याचा संकल्प केला तर कोणीही मागे पडू शकत नाही. यासाठी सदैव पुढे जाण्याचा संकल्प करून पात्रतेनुसार चांगली संधी मिळवा. जेणेकरून विविध क्षेत्रात प्रामाणिकतेने काम करून समाजाला न्याय देता येईल, असे प्रतिपादन आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्राच्या वतीने इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदव्युत्तर परिक्षेत उच्च गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव तसेच इयत्ता ४ थी ते ९ वी मध्ये शिकत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून वह्यांचे वाटप कार्यकम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार झाला.यावेळी विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) तथा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, सरचिटणीस बा.बा. वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

निवृत्त झाल्यानंतरही आपल्याकडे कुटुंबाची, समाजाची मोठी जबाबदारी असते. तेव्हा कामातून मुक्त झाल्यानंतर समाजहिताची कामे करावी, असे आवाहन श्री.पटोले यांनी केले.

यावेळी पत्रकार मधुकर भावे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विविध क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. पालकांनी कुठलीही सक्ती न करता मुलांमधील गुण ओळखून उत्तम मार्गदर्शन करावे. विधिमंडळ कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मासिक सुरू करण्याची सूचना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुमारी ऐश्वर्या पद्मनाभ महाडेश्वर हिने काठमांडु (नेपाळ) येथे झालेल्या टग ऑफ वॉर या स्पर्धेत इंटरनॅशनल लेवल सुवर्णपदक मिळविल्याबदल विशेष सत्कार करून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार केला.
थोडे नवीन जरा जुने