येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना



विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई : येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करावे, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिल्या.

व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला.

मंत्री श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली असून या कामात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् अॅन्ड गाईडस्, स्पोर्टस् क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावे. यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या सर्व आराखड्यांचा सर्वंकष विचार करून संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासाठी 1 मार्चला राज्यस्तरीय परिषद किंवा बैठक घेऊन मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केल्या.

प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगल यूज प्लास्टिकमुक्त चळवळीमध्ये लोकांना सामावून घेणे आवश्यक आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी नवनवीन कल्पना मांडाव्यात व आराखडे तयार करावेत, पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे यासाठी सहकार्य लाभेल, असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

राज्यातील रस्ते, तलाव अशा सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक आढळून येते. या सार्वजनिक ठिकाणी पडलेले प्लास्टिक उचलून त्याचे व्यवस्थापन करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर कुमार श्रीवास्तव म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी सिंगलयूज प्लास्टिक मुक्तीसाठी संबंधित भागात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने