शिवजयंती साजरी करणे म्हणजे केवळ पोवाडे करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का ?आपण आता तिथीप्रमाणे किंवा तारखेप्रमाणे  शिवजयंती साजरी करतो. जयंती साजरी करणे,म्हणजे केवळ पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का?  खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी करणे, म्हणजे शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय करणे होय. 

सध्या याला एका उत्सवाचे स्वरूप आले आहे. आपल्याला यामध्ये पालट करायचा आहे; कारण शिवरायांसारखे आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श युगपुरुषाला घडवणारी त्यांची जीवनपद्धत आणि आपली जीवनपद्धत
खेळ खेळणे

मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.

मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.

काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा. विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे इत्यादी.

मित्रांनो, अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. 

अशा मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का? मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे ? आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती आहे. मग कराल ना ?
थोडे नवीन जरा जुने