वसंतराव नाईक भटक्या जमाती सहकारी सूत गिरणीतील अपहाराप्रकरणी 37 जणांवर गुन्हे दाखलमुंबई : कोल्हापूर येथील शिवम सहकारी बँकेत २०१७-१८ या कालावधीत सोलापूरच्या वसंतराव नाईक भटक्या जमाती सहकारी सूत गिरणीच्या नावे बनावट खाते सुरू करण्यात आले होते. यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून, संबंधित ३७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहाराची रक्कम जे.के.शुगर कारखान्याकडे वळती केल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित कारखान्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

शिवम सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सदस्य संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या बँकेत सूतगिरणीचे बनावट खाते सुरू करून, कर्ज घेण्यात आले. या बँकेचे व्यवस्थापकच सूतगिरणीचे संचालक असून हा २४ कोटी ४२ लाखाचा अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची एटीएसद्वारे चौकशी सुरू असून, चौकशीअंती संबंधितांची खाजगी मालमत्ताही सील करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम ज्या कारखान्याकडे गेली, त्या संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, प्रशांत बंब, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला.
थोडे नवीन जरा जुने