'व्हिटॅमीन ई’ची कमतरता झाल्यास हे करा
तसे पाहिले तर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सर्वच जीवनसत्त्वांची गरज असते. मात्र, त्यात सर्वात महत्त्वाचे असते व्हिटॅमीन ई. तज्ज्ञांच्या मते ‘व्हिटॅमीन ई’ची कमतरता झाल्यास अकाली वृद्धत्व येऊन त्वचेवर अनेक दुष्परिणाम होतात.

ज्या व्यक्तींना कमी फॅट असलेला आहार घेण्याची सवय असते त्यांच्या शरीरात व्हिटॅमीन ‘ई’ची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. अशा स्थितीत फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान थांबवणे अशक्य होते. यामुळे प्रीमॅच्योर एजिंगसोबतच (अकाली वृद्धत्व) मधुमेह, दृष्टिदोष, स्नायू ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे शरीर अन्नातील जीवनसत्त्वे योग्य प्रकारे शोषून घेत नाही.


व्हिटॅमीन ‘ई’ची महत्त्वाची भूमिका
हा फक्त त्वचेसाठी नाही तर डोळ्यासाठीदेखील पोषक घटक आहे. प्रतिकारशक्ती सक्षम करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. पेशींची हानी रोखणारा हा सर्वात चांगला अँटीऑक्साइड घटक आहे. नर्व्हस सिस्टिम आणि स्नायूच्या केंद्रीय प्रणालीचे यामुळे संरक्षण होते. तीव्र उन्हामुळे होणारे त्वचेचे आणि केसांचे नुकसान भरून काढण्याचे काम व्हिटॅमीन ई करते. व्हिटॅमीन ईमध्ये एवढे गुण असल्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा व्हिटॅमीन ई वापरले जाते.


नैसर्गिक स्रोत
सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा व्हिटॅमीन ईच्या नैसर्गिक स्रोतांना प्राधान्य दिले पाहिजे. वनस्पती तेल, सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, अंडी, सुकामेवा यांचे जास्त सेवन केले पाहिजे. या पदार्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमीन ई असते.


याकडे लक्ष द्या

पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने तयार होणार्‍या व्हिटॅमिन ई ला प्राधान्य दिले पाहिजे. कृत्रिम व्हिटॅमिन ई घेण्याचे टाळावे.

स्वत:च्या मर्जीने व्हिटॅमिन ईचा जास्त डोस घेतल्यास त्वचेवर अनेक दृष्परिणाम दिसतात. डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच हे घ्यावेत.

जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेतात त्यांनी स्वत:हून व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्सचे सेवन करू नये.थोडे नवीन जरा जुने