सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तुमच्या पुढे या समस्या आ- वासून उभ्या आहेत
खाण्याची अनावर भावना, ही मनोवैज्ञानिक क्रियेमधील विकृती असते. साहजिकच या व्यक्तींंमध्ये अनेक मानसिक दोषसुद्धा असतात. ते सतत तणावाखाली आणि चिंताग्रस्त असतात. त्यांचे हे ताणतणाव आणि चिंता खाल्ल्यानंतर कमी होतात.

पला देश खरोखरच कमालीच्या विविधतेनं नटलेला आहे. एका बाजूला अमर्याद कुपोषणग्रस्त बालकांची भीषण समस्या आ- वासून उभी असताना, दुसऱ्या बाजूला स्थूल व्यक्तींची संख्या तितक्याच वेगानं वाढते आहे. एका पाहणीनुसार आपल्या देशात, 'बिंज इटिंग डिसऑर्डर' हा खादाडपणाच्या व्यसनाचा एक विकारच वाढीला लागला आहे.
खाणं ही शरीराची गरज असते. भूक लागली की लहान बाळ रडतं, त्याला खाऊ मिळाला की बक्षीस मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटतो. म्हणजे खाणं हे तसं मुळातच आपल्या भावभावनांशी आणि मानसिकतेशी संबंधित असतं.

तसं आपण सारेच कधी ना कधी तरी आपल्या आवडीच्या पदार्थांवर आडवा हात मारतो. लग्नसमारंभात किंवा घरी आवडीचा पदार्थ बनला असेल, तर एखाद्या वेळेस अगदी तडस लागेपयंर्त जेवतो. असं खाताना स्वत:वरचा ताबा सुटल्याप्रमाणे खा खा करणं आणि कुठं थांबायचं हे न कळणं, असा प्रकार जेव्हा खूप वरचेवर होऊ लागतो, तेव्हा त्या व्यक्तीला ही खादाडपणाची बिंज डिसॉर्डर किंवा अति खाण्याचं व्यसन लागलं आहे, असं मानलं जातं.

खादाडपणाच्या व्यसनानं त्रस्त रुग्णांच्या वर्तनात काही विशेष लक्षणं जाणवतात. त्यांना खा खा सुटली, की ते थांबूच शकत नाहीत. एकामागोमाग एक बकाणा भरण्याच्या क्रियेवर त्यांचा ताबा राहतच नाही. पोट आधीच भरलेलं असलं, तरी खाण्याचा मोह ते आवरू शकत नाहीत. आपल्याला खाण्याची इच्छा झाल्यावर काहीतरी खायला मिळावं, म्हणून खाण्याचे अनेक पदार्थ गुप्तपणे जमा करून ठेवतात आणि गुपचूपपणे त्यावर ताव मारतात. विशेष म्हणजे इतरांसमोर खाताना ते सामान्य लोकांसारखे खातात; पण एकटे असताना त्यांच्यातला बकासुर जागा होतो. त्यांच्या एकावेळच्या खाण्याचं प्रमाण तर जबरदस्त असतंच; पण दिवसभरातदेखील ते सतत काही ना काही तरी चरतच असतात.

खाण्याची अनावर भावना, ही मनोवैज्ञानिक क्रियेमधील विकृती असते. साहजिकच या व्यक्तींमध्ये अनेक मानसिक दोषसुद्धा असतात. ते सतत तणावाखाली आणि चिंताग्रस्त असतात. त्यांचे हे ताणतणाव आणि चिंता खाल्ल्यानंतर कमी होतात. त्याचवेळी आपण खूप खातो, याबद्दल त्यांना मनोमन शरमल्यासारखं वाटतं. कित्येकांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊन बसते.
एकीकडे खाद्यपदार्थांवर ताव मारताना एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे ते संवेदनाशून्यपणे खात असतात, तर दुसरीकडे आपले वजन वाढतं आहे आणि खाणं आवरता येत नाही याची चिंता त्यांना सातत्यानं त्रस्त करीत असते. दाडपणा निर्माण होण्याच्या कारणांमध्ये लहानपणी पालकांनी खाण्यापिण्याबाबत लावलेल्या सवयी, मानसिक चिंता, ताणतणाव, न्यूनगंडाची भावना या गोष्टी जशा कारणीभूत असतात, तशाच भुकेच्या संवेदनेचं नियंत्रण करणाऱ्या मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागातील संदेशवहनामधील बिघाडसुद्धा जबाबदार ठरतो.
खादाडपणाच्या या व्यसनामुळे अतिरिक्त वजनवाढ, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचे, सांध्यांचे आजार असे शारीरिक; तर चिंता, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक व्यथासुद्धा निर्माण होतात. या रुग्णांमध्ये व्यसनाधीनता आणि आत्महत्या करण्याकडे असलेला कल देखील निदर्शनास आलेला आहे. व्यक्तिगत बाबतीत, अनिबंर्ध खाण्याच्या या सवयीमुळे घरात वाद, पेचप्रसंग आणि कटकटी निर्माण होतात.

खादाडपणाच्या व्यसनावर इतर व्यसनांच्या इलाजाप्रमाणे इलाज करावा लागतो. इतर बाबतीत ते व्यसन पूर्णपणे सोडून द्यायला सांगितलं जातं. या केसमध्ये खाणं सोडून द्या म्हणून सांगता येत नाही, त्यामुळे यावरील उपचार थोडा क्लिष्ट ठरू शकतो. यासाठी इतर नैराश्य आणि चिंताविरोधी औषधांबरोबर मानसिक सल्लामसलत फार महत्त्वाची असते.
खाण्याचा मोह आवरणं, आपल्या पोटाला किती आवश्यक आहे आणि आपल्याला भूक लागली आहे का, याची जाणीव निर्माण करणं आवश्यक असते. रुग्णांना खाण्याची डायरी ठेवून आपल्या सवयी कशा ताब्यात येत आहेत, यावर सजगपणे लक्ष ठेवायला शिकवावं लागतं. खाण्याची तीव्र इच्छा ताब्यात ठेवण्यासाठी मनावर काबू करायला शिकावंच लागतं.
मनोनिग्रह शिकण्यासाठी काही प्रमाणात चिंतन, एकाग्रता आणि ध्यानधारणा यांचा उपयोग होतो. मनोविकारतज्ज्ञ समुपदेशन फारच आवश्यक ठरतं. दुष्काळग्रस्त आणि भुकेकंगाल जनतेच्या जगण्याचा प्रश्न सोडविणं, ही एकीकडे आपल्या देशापुढे मोठी समस्या असताना चार-पाच जणांचं अन्न बसल्याजागी फस्त करणाऱ्या खादाड रुग्णांचं व्यसन सोडविणं, हा खरोखरच आजच्या जीवनशैलीतील विरोधाभास आहे.

थोडे नवीन जरा जुने