म्हणून येतो तरुण वयात हृदयविकाराचा झटका
आजकाल अनेक तरुण कॉरोनरी आर्टरी डिसऑर्डर्स (सीएडी) आणि हृदयविकाराच्या झटक्यांनी त्रस्त झालेले दिसून येत आहेत. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय तरुणांना हृदयविकार मोठ्या प्रमाणावर जडल्याचे दिसून येते. उत्पादनक्षम आणि तरुण वयात हृदयविकाराचा त्रास होणे हा संपूर्ण आशिया आणि भारतासाठी मोठा धोका बनला आहे.

औरंगाबादच्या एका प्रथितयश रुग्णालयाने 27 वर्षीय रुग्णाची यापासून सुटका केली, ज्याला अँटिरिअर वॉल एआय (हृदयविकाराचा झटका) आला होता. आजाराचे निदान केल्यानंतर डॉ. मगरकर यांनी तातडीने उपचार करून हृदयाकडे रक्त वाहून नेणा-या वाहिनीत दुरुस्ती केली. नंतर त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे ठोके पूर्ववत आणण्यासाठी उपचार सुरू केले.

येथील रुग्णालयात तीन महिन्यांच्या कालावधीत 400 हून अधिक हृदयविकारांशी संबंधित प्रक्रिया या रुग्णालयात पार पडली. यातील 15 टक्के रुग्ण हे 20 ते 40 वर्षे वयोगटातील होते. हे रुग्ण वेळेवर रुग्णालयात आल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर लगेच उपचार करता येणे शक्य झाले व ते लवकर बरे होऊ शकले.
चुकीच्या निदानामुळे धोका बळावतो - अनेक तरुणांना हलका हृदयविकाराचा झटका येतो. हासुद्धा भारतात एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. भारतात असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना असे हृदयविकाराचे धोकादायक घटक दिसून येत नाहीत, पण त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. अनेक वैद्यकीय संस्था हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करू शकत नाहीत. विशेषकरून तरुणांमध्ये. कारण त्यांना हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो. परिणामी वैद्यकीय तज्ज्ञ एकाच प्रकारची औषधे देतात व एक सर्वसाधारण उपचार करू लागतात.

सर्वसाधारणपणे छातीत जळजळ, मळमळणे किंवा उलटीसारखे वाटणे हे तरुण वयात हायपर अ‍ॅसिडिटीचे लक्षण धरले जाते. त्यानुसारच उपचार केले जातात. चुकीच्या निदानामुळे हृदयाचा त्रास वाढतो. त्यामुळे अतिशय कठीण प्रसंगी ही स्थिती कार्डिओलॉजिस्टकडे पाठवली जाते. हे सर्व टाळण्यासाठी अशा प्रकारच्या रुग्णांची ईसीजी, इको डॉप्लर, कार्डियाक बायो मार्कर, रक्त तपासणी यामुळे हृदयविकाराचा झटका ताबडतोब ओळखता येतो.


माझ्यासह काही तज्ज्ञ मंडळींनी केलेला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या पाच दक्षिण आशियाई देशांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. हृदयविकाराने मृत्यू ही घटना दक्षिण आशियाई क्षेत्रात अन्य देशांच्या तुलनेत पाच ते दहा वर्षे आधीच दिसून येते. यात युरोप, दक्षिण आशियाई देश तसेच अमेरिकेचाही समावेश आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात ज्याचे नाव ‘रिस्क फॅक्टर्स फॉर अर्ली मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इन साऊथ एशियन्स कम्पेअर्ड विथ इंडिव्हिज्युअल्स इन अदर कंट्रीज’ असे होते. त्यात 1732 मध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांचा आणि 2204 कंट्रोल्सचा अभ्यास 15 वैद्यकीय केंद्रांतून घेण्यात आला.

यात सेंट जॉन मेडिकल कॉलेज, बंगळुरू, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर यांचा समावेश होता. अन्य देशांतील 10,700 हृदयविकाराच्या केसेस व 12,500 कंट्रोल्सचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर मी अभ्यासाचे निष्कर्षही समोर ठेवले. हृदयविकार हा श्रीमंत माणसांचा आजार आहे हा भ्रम समोर ठेवला. त्यांच्या मते 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील आहेत.
भारतातील 10 वयस्क व्यक्ती या हृदयविकाराने त्रस्त आहेत. शहरी विभागातील 16 टक्के जनता ही विविध प्रकारच्या हृदयविकारांनी ग्रस्त आहे. ही ट्रेंड खूपच घातक आहे. परिणामी रुग्णांच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा वाढवण्याची गरज आहे. जर हा ट्रेंड सुरू राहिला तर भविष्य खूप धूसर आहे. सीएडीत रक्तवाहिन्यांमध्ये मेद साठल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या वाहिन्या काही कालावधीनंतर आकुंचन पावू लागतात, पण त्यातील मेदाचा काही भाग सुटून निघू लागतो. परिणामी तो हृदयात जाऊन हृदयविकाराचा झटका येतो. काही हृदयविकाराचे झटके हे मध्य आणि उतारवयात सारखेच असतात. वाढता तणाव, वेगवान जीवनशैली, जेवणाच्या सवयी, हायपरटेन्शन, कामाचा दबाव हा कित्येक पटीने वाढला आहे.
परिणामी विशीतच किंवा अगदी तिशीच्या सुरुवातीसच हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. आजच्या सर्वसाधारण जीवनशैली आणि कामांशी संबंधित आजारांमध्ये छातीत दुखणे किंवा हृदयविकार हा एक सर्वसाधारण आजार ठरला आहे. पूर्वी हा आजार 40-45 व्या वर्षी डोके वर काढत असे. आजाराचा सर्वात घातक घटक म्हणजे बदलता आजार. पूर्वी हृदयविकाराचे झटके आणि मायोकार्डियल डॅमेज हे फार घातक असते. एकूण 6 ते 10 टक्क्यांची वाढ ही गेल्या दशकात दिसून आली आहे.

उपचार :-
थ्रॉम्बोलिटिक प्रक्रियेचा उपयोग रुग्णालयात ताबडतोब हृदयविकाराचा झटका आल्यावर केला जातो. सर्वसाधारणपणे झटका आल्यापासून तीन तासांत उपचार केले जातात. सर्वसाधारणपणे रक्तवाहिन्यात (इंट्रोव्हेनस किंवा आयव्ही) च्या स्वरूपात हे उपचार केले जातात.
या औषधांमुळे रक्तातील गुठळ्या विरघळतात किंवा फुटतात. परिणामी रक्तपुरवठा सुरळीत होऊ लागतो. रुग्ण वेळेत कॅथलॅबमध्ये पोहोचू शकला तर हृदयाकडील वाहिनीतील अडचणी लगेच शस्त्रक्रिया करून मोक ळ्या केल्या जाऊ शकतात.
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान या रक्तवाहिन्यांमुळे हृदयाला येणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अँजिओप्लास्टीमुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. यात विशेषकरून लवकर तो फुगा घातला आणि रक्तवाहिनीचा मार्ग मोकळा केला तर रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने जो धोका निर्माण झालेला असतो तो टाळता येतो.

इंटरव्हेन्शनल थेरपीत सर्वसाधारणपणे बलून आणि स्टेंट असतो. यात आता इतकी प्रगती झाली आहे की, ते उपचार रुग्णासाठी साधारण उपचार ठरू लागले आहेत.थोडे नवीन जरा जुने