का होतो व्हॅस्क्युलर ट्यूमर? कसा ओळखाल? उपचाराच्या पद्धती


हात, पाय, गळ्यावरील लाल रंगाच्या किंवा त्वचेचा रंगाच्या ट्यूमरबाबत ऐकले किंवा पाहिले असेल. त्याच्यावर हात ठेवल्यानंतर ते धडकत असल्याची जाणीव होते. कधी-कधी हा ट्यूमर धडधडतानाही दिसतो. 

एखाद्याच्या छातीत किंवा पोटातही असा ट्यूमरचा गोळा असू शकतो. तो लाल रंगाच्या चेरीप्रमाणे निमुळता असतो. या ट्यूमर किंवा धडकणार्‍या गाठीला वैद्यकीय भाषेत हिमॅन्जियोमा, अँन्जियोमा, व्हेनस मालफॉर्मेशन किंवा अँन्युरिझम म्हणतात. सामान्यत: त्याचे मिळते-जुळते नाव व्हॅस्क्युलर ट्यूमर आहे.

शंका आली तर काय कराल? :
व्हॅस्क्युलर ट्यूमरची शंका आल्यास सर्जनचा सल्ला घ्या. त्यांच्या निगराणीमध्ये कलर डॉप्लर, सीटी अँजिओ किंवा एमआर अँजिओसारख्या तपासण्या करा. ट्यूमर वाढल्यानंतर फुटू शकतो, त्यामुळे अधिक रक्तप्रवाह होऊन मृत्यूही येऊ शकतो. व्हॅस्क्युलर ट्यूमर किंवा त्याच्याशी संबंधित रक्त वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी साठल्यामुळे हातापायांचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे गँगरीन होऊ शकते किंवा हातपाय बेडौल होऊ शकतात. व्हॅस्क्युलर सर्जरीची सुविधा महानगरांतील काही निवडक रुग्णालयांमध्येच उपलब्ध असल्यामुळे ज्या रुग्णालयात अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध आहे, अशाच रुग्णालयात उपचार करा.

का होतो व्हॅस्क्युलर ट्यूमर? : 
बहुतांश व्हॅस्क्युलर ट्यूमर जन्मत:च असतात. रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जन्मत:च दोष निर्माण झाल्यामुळे तो निर्माण होतो. शिशुकाळात तो छोटा असतो. वयाबरोबरच त्याचा आकारही वाढतो. कधी-कधी तर तो खूपच मोठा होतो. जखम किंवा अपघातामुळेही व्हॅस्क्युलर ट्यूमर होऊ शकतो. जखमेमुळे रक्तवाहिन्या क्षतिग्रस्त होतात व तिच्या भिंती कमकुवत पडतात. रक्ताचा दबाव सहन न झाल्यामुळे त्या भिंतीचा एक भाग फुगून व्हॅस्क्युलर ट्यूमर बनतो. मधुमेह व रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळेही तो होण्याची शक्यता असते. रक्तातील जास्त कोलेस्टेरॉलमुळे चरबी साठून रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात. त्या भिंतीच व्हॅस्क्युलर ट्यूमर बनतात. त्यांना अँन्युरिझम म्हणतात.

कसा ओळखाल? : 
तुमचा हात, पाय किंवा पाठीवर बालपणात वर आलेली एखादी मऊ गाठ असेल, तारुण्यात तिचा आकार वाढला असेल तर तो व्हॅस्क्युलर ट्यूमर असू शकतो. केव्हाही हात, जांघ किंवा पायावर जखम झाल्यामुळे काही महिन्यांनंतर वाढलेली गाठ कमी होण्याऐवजी वाढतच चालली असेल तर ते अँन्युरिझमचे लक्षण असू शकते. जर तुम्ही चाळिशीनंतर उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेहाने पीडित असाल तर तुमच्या छातीत किंवा पोटामध्ये रक्तवाहिन्यांचा ट्यूमर म्हणजेच अँन्युरिझम वाढण्यास सुरुवात झाली असण्याची शक्यता आहे. असा ट्यूमर मानेलाही होऊ शकतो.

उपचाराच्या पद्धती : 


आजार माहीत झाल्यानंतर उपचाराच्या पद्धती विचारात घेतल्या जाऊ शकतात. त्यामध्ये शस्त्रक्रिया हा खात्रीशीर उपाय आहे. विशिष्ट परिस्थितीत स्टेंटिगद्वारेही उपचार केला जाऊ शकतो. उपचाराची पद्धती निश्चित करण्याआधी रुग्णाचे वय, त्याचे मधुमेह, रक्तदाबासारखे आजार, ट्यूमरची स्थिती व आकार आदी माहिती असणे आवश्यक आहे. कारण तीच उपचाराची दिशा निर्धारित करते.

थोडे नवीन जरा जुने