सिरोंचा : शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्र
मुंबई: राज्यात शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्रावर भारतीय कापूस निगम आणि कापूस फेडरेशन यांच्या पुढाकाराने १५७ केंद्रावर कापूस खरेदी करण्यात आला. २८ हजार ७४ कोटी मूल्याचा माल खरेदी करण्यात आला आहे. २१ हजार १० शेतकऱ्यांना त्याचे मूल्य देण्यात आले आहे. ७६४ कोटीचे चुकारे अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे विशेष बाब अंतर्गत विचार करून तेथे शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.
सदस्य कृष्णा गजबे यांनी सिरोंचा येथे शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात कापसाचे अधिक उत्पन्न झाले असून, राज्यात किमान आधारभूत किंमतीने कापसाची खरेदी भारतीय कापूस निगम लि. यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ (सीसीआय) मर्यादित यांच्यामार्फतही करण्यात येते. यासंदर्भात सीसीआयसोबत केलेल्या करारानुसार जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी उपलब्ध असलेल्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. गडचिरोली येथे ही फॅक्टरी नसल्याने खरेदी केंद्रही नाही. सिरोंचा येथील शेतकऱ्यांना याच जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथे कापूस विक्री करण्यास मुभा दिली आहे. तरीही, शेतकऱ्यांचा विचार करून गडचिरोलीला विशेष बाब अंतर्गत आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ७३ ग्रेडर काम करीत आहे. बीड जिल्ह्यासाठी कापूस खरेदी करण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातून ग्रेडर देण्याची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ३० टक्के खरेदी करण्यात आली आहे. सर्व कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.

मिरची पिकाचा मसाला या घटकामध्ये समावेश करण्यासंदर्भात कृषी व पणन विभागाशी समन्वय साधून मार्ग काढण्यात येईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेस सदस्य गिरीष महाजन, प्रकाश साळुंखे, योगेश सागर, चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला होता.
थोडे नवीन जरा जुने