कोकणातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आढावा
मुंबई: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला.
चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा बैठक बोलाविली होती.

यावेळी श्री.चव्हाण यांनी धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. हाजी मलंग, पालघर येथील शासकीय विश्रामगृह, नियोजन भवन, अलिबाग, पनवेल येथील 100 खाटांचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, कर्जत येथील आश्रमशाळा, रत्नागिरी जिल्हा न्यायालय, मनोर येथील वारली हट, पालघर येथील 200 खाटांचे रुग्णालय तसेच निर्माणाधीन असलेल्या इतरही अनेक शासकीय इमारतींच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकाम) अजित सगणे, मुख्य अभियंता पी. के. इंगोले, ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. टी. पाटील, रायगड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. पाटील, रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने