राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच - सुधीर मुनगंटीवार


मुंबई : अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवू नये, अशा अर्थाचे माझे वक्तव्य आहे. ज्या शिवसेनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्या शिवसेनेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक त्या तरतुदी केल्या गेल्याच नाहीत. 

एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला फसवलेच आहे, असे मी म्हणालो. या वेळी समोरच्या बाकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने 'भाजपाने चूक केली म्हणून शिवसेना आमच्याकडे आली,' असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मी उपाहासात्मक उत्तर दिले. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

अनेक वर्षे मित्र असलेल्या पक्षाला फसवण्याची आमची वृत्ती नाही. अकाली दलासारख्या पक्षाबरोबर आमची ४०-५० वर्षांपासूनची युती आहे. शिवसेनेबरोबरही ३० वर्षे आमची मैत्री होती. मित्रपक्षाला फसवण्याचे काम आमच्या हातून कधीच झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही.

 माझ्या वक्तव्याचा कृपा करून चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. विधानसभा निवडणुकीतील संभाव्य युतीविषयी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्यामध्ये भाजपाच्या वतीने शिवसेनेला तसा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता. त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

विधिमंडळातील भाषणादरम्यान एकमेकांवर कुरघोडी करताना कधीकधी अतिशयोक्ती केली जाते किंवा टोल्याला प्रतिटोला हाणला जातो. विधिमंडळात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अशा शाब्दिक चकमकीचे अनेक किस्से आठवत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा प्रचारावेळी वारंवार भाजपाचाच मुख्यमंत्री असेल, असे सांगितले होते. त्यामुळे माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नये, असेही मुनगंटीवार म्‍हणाले.
थोडे नवीन जरा जुने