ट्रकच्या धडकेत वृद्ध ठारजालना : भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक वृद्ध जागीच ठार झाला. जालना शहरातील सुभाष चौकात सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली. कन्हैय्यालाल पुनमचंद गारे (६५, रा. बरवार गल्ली, काद्राबाद) असे मृताचे नाव आहे.

कन्हैय्यालाल गारे हे सकाळी लोखंडी पूल परिसरातील शीतलामाता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून घरी परत जाताना मुथा बिल्डिंगकडून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच २१, ९४९६) त्यांना मागून धडक दिली. गारे हे ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. 

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक गणेश झालवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रस्त्यावरून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट सदर बाजार ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी चालकावर कारवाईचे आश्वासन देत नातेवाइकांशी चर्चा केली.

 त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी मृत गारे यांचा मुलगा मंगल गारे (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालक संशयित लालखान मेहबूब खान पठाण (रा. बदनापूर) यास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने