जगभरात ५ हजारांवर बळी


वॉशिंग्टन : जगभरात गुरुवारी कोरोनाचे ६ हजार ७२९ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ३४ हजारांवर गेला आहे. तर कोरोनामुळे ३५१ लोकांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ५ हजारांवर पोहोचला आहे. 

मात्र, एकीकडे नव्या रुग्णांची आणि बळींची संख्या वाढत असली तरी या प्राणघातक विषाणूची लागण झाल्यानंतर वेळीच आणि नेमके उपचार मिळाल्याने १ लाख २८ हजार लोक बरे झाले आहेत, याकडेदेखील दुर्लक्ष करता येणार नाही.

चीनमधील रुग्ण आणि बळींच्या संख्येत आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चीनमध्ये गुरुवारी अवघे ८ नवे रुग्ण आढळले, तर ७ जणांचा मृत्यू झाला. आता युरोप या जागतिक महामारीचे नवे केंद्र म्हणून समोर येत आहे. इटलीमध्ये बळींचा आकडा हजाराच्या पुढे गेला असून, १५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 इटलीत हॉस्पिटल्स आणि मेडिकल वगळता सर्व दुकाने, शिक्षण संस्था, कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. फ्रान्स, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, लिथुआनिया, अल्जेरिया आणि स्लोव्हाकिया या देशांनीही सर्व शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत. इराणमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांच्या पुढे गेला असून, आतापर्यंत सुमारे ५१४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मात्र, या देशातील सामूहिक दफनभूमीची उपग्रहामार्फत घेतलेली छायाचित्रे समोर आल्याने मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १६००हून अधिक झाला आहे. अनेक देशांनी लोकांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत सार्वजनिक ठिकाणे बंद केली आहेत.
थोडे नवीन जरा जुने