घातक वस्तू मुलांपासून दूर ठेवा
मीरा रोड येथे राहणा-या सनी कनोजिया यांच्या ४ वर्षाच्या मुलाने (राजवीर कनोजिया) नजरचुकीने पिण्याचे पाणी समजून कारच्या बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे पाणी प्यायल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता.
कनोजिया हे पेशाने ड्राइव्हर आहेत व त्यांनी घरातील पाणी पिण्याच्या बिसलेरीच्या बॉटलमध्ये बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे पाणी भरून ठेवले होते. सल्फरीक अ‍ॅसिडचा समावेश असणारे हे पाणी राजवीरच्या पोटात गेल्यानंतर त्याला रक्ताच्या उलटय़ा, पोटदुखी तसेच श्वास घ्यायला त्रास सुरू झाला.

स्थानिक रुग्णालयात राजवीर उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याची प्रकृती अधिक खालावण्यास सुरुवात झाल्यामुळे ७ तासांनी त्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

राजवीरच्या हिमोग्लोबीनच्या संख्येतसुद्धा घट झाली होती, अशा वेळी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (लहान मुलांचे पोटविकार तज्ज्ञ ) डॉ. ललित वर्मा म्हणाले, ‘‘राजवीरला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यांनतर छोटय़ा व मोठय़ा आतडयांची एन्डोस्कोपी करून सल्फरीक अ‍ॅसिडमुळे पोटातील खराब झालेल्या अवयवांवर तात्काळ उपचार करण्यात आले तसेच पोटात नळी टाकून ते सल्फरीक अ‍ॅसिड काढून टाकले.

अन्ननलिका व त्याच्या उगमस्थानापासून ग्रेड २ची इजा झाल्यामुळे अंतर्गत रक्तस्रव झाला होता अशा वेळी अजून २ तास उशीर झाला असता तर कदाचित अन्ननलिका कायमस्वरूपी जायबंदी झाली असती.

अ‍ॅसिड पोटात गेल्यामुळे अशा केसमध्ये भविष्यात आतडयांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर तीन वर्षानी राजवीरला एन्डोस्कोपी व वयाची १८ र्वष पूर्ण झाल्यानंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला आहे.

दोन आठवडयांच्या उपचारानंतर राजवीरला घरी सोडण्यात आले असून आता त्याची प्रकृती उत्तम असून दर पंधरा दिवसांनी त्याच्या पोटाची तपासणी करण्यात येत आहे.

घरामध्ये वापरण्यात येणारी कीटनाशकं, उंदरांना मारायचे विष, त्वचारोगांवरील औषधे, ब्लीच सल्फरीक अ‍ॅसिड आणि तरल इंधन जसे पैराफिन (रॉकेल-तेल) कोणत्याही पेय पदार्थाच्या बाटलीत ठेवू नये. अशा वस्तू व पदार्थ स्पष्टपणे खूण करून ठेवलेल्या कंटेनरमध्ये व मुलांच्या नजरेपासून दूर ठेवाव्यात.

आपल्या घरात पुष्कळशी विषे उपलब्ध असतात व जी तोंडावाटे पोटात गेली तर फारच घातक ठरतात व त्यामुळे मेंदू निकामी होणे, अंधत्त्व येणे, शरीराचा अर्धा भाग निकामी होणे किंवा आयुष्यभरासाठी महत्त्वाचे अवयव जायबंदी होण्याची शक्यता असते.

आपण घरामध्ये अनेक वेळा हानिकारक पदार्थ आपल्या रोजच्या वापरात येणा-या बाटल्यांमध्ये अथवा बरण्यांमध्ये ठेवल्यामुळे लहान मुलांची गफलत होऊन प्राणघातक आजार अथवा अपघात होण्याची शक्यता असते.

त्यामुळे प्रत्येक पालकांनी याबाबत काळजी घ्यावी व अशी घटना घडली तर वेळ न दवडता निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी केले
थोडे नवीन जरा जुने