धुम्रपान करणा-या महिलांना फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका
तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना अधिक असतो. आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरातील महिलांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा जास्त धोका असतो, असा पूर्वी समज होता, पण आर्थिकदृष्टय़ा सधन कुटुंबांतील महिलांमध्येही हा कर्करोग आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे.


वातावरणातील प्रदूषणही घातक

‘धुम्रपानामुळे पुरुष आणि महिला या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सारख्याच प्रमाणात असतो. असे असले तरी घरात होणा-या जळणामुळेही महिलांना हा विकार जडण्याची शक्यता असते. घराच्या आत प्रक्रिया न केलेल्या जैविक इंधनाचा (लाकूड, कोळसा) स्वयंपाकासाठी व अन्न गरम करण्यासाठी देशभरात मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषणही होते. अशा प्रकारच्या प्रदूषणाचा संबंध श्वसनाच्या अनेक विकारांशी आहे, त्याचप्रमाणे फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणेही त्यामुळे वाढताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या स्वयंपाकाशी आणि अन्न गरम करण्याशी संबंधित धुराच्या संपर्कात असणा-या महिलांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेने काकणभर अधिक असतो.

महिलांकडून होणा-या तंबाखू सेवनामध्ये भारतीय महिलांचा जगभरात तिसरा क्रमांक आहे आणि सुमारे १२ दशलक्ष महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचे सेवन करतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाच्या अहवालानुसार पुरुष आणि महिलांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचे प्रमाण २००२ साली ४.५:१ असे होते ते वाढून २००८ मध्ये ३:१ एवढे झाले आहे. त्याचप्रमाणे भारतातील बहुतेक कर्करोग केंद्रांकडूनही महिलांना होणा-या कर्करोगाच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जीवनशैलीमध्ये झालेला बदलही महिलांना कर्करोगाची लागण होण्यात महत्त्वाचा घटक ठरत आहे. ‘शहरी भागांत महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. धुम्रपान, अप्रत्यक्ष धुम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग), धुम्रविरहित तंबाखू यांचा कर्करोगाची लागण होण्याशी थेट संबंध आहे.’

धुम्रपान करणा-या महिलांमध्ये विशिष्ट प्रकारचे जनुकीय उत्परिवर्तन होते, ज्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांच्या कर्करोगाचा सूक्ष्मशारीरिक प्रकार असलेल्या फुफ्फुसांचा अ‍ॅडेनोकार्सिनोमा उद्भवतो. संशोधनातून दिसून आले आहे की, ज्या महिला कमी काळापासून धुम्रपान करत आहेत किंवा अप्रत्यक्ष धुम्रपान करत आहेत त्यांना पुरुषांच्या तुलनेने उत्परिवर्तन होण्याची आणि तरुणपणीच कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
वातावरणातील प्रदूषण हा सुद्धा धुम्रपान करणा-यांना व न करणा-यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक असतो.

तंबाखू सोडल्यास मृत्यूचा धोका कमी

‘धुम्रपानाचा तोंड, कंठ (व्हॉइस बॉक्स), घसा, फुफ्फुस, ग्रासिका, पोट, स्वादुपिंड, यकृत, बृहदांत्र, गुदांत्र, गर्भाशयग्रीवा, मूत्रपिंड, मूत्राशय आणि रक्ताचा कर्करोग याच्याशी थेट संबंध आहे. तंबाखू खाण्यामुळे तोंड, अन्ननलिका, पोट आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होऊ शकतो.’

तंबाखू सेवन करण्याची कोणतीही पद्धत सुरक्षित नाही. ‘कर्करोगाचे निदान झाल्यावर तंबाखू सोडून दिल्यास मृत्यूचा धोका कमी होतो. धुम्रपान करणा-या व्यक्तीसोबत राहत असल्यास कर्करोग होण्याचा धोका २० ते ३०% वाढतो. पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंड हँड स्मोकिंग केल्यामुळे प्रौढांना फुफ्फुस, छाती, नेसल कॅव्हिटी आणि नासाग्रसनी कर्करोग तर मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग आणि ब्रेन टय़ुमर होण्याची शक्यता अधिक असते. पॅसिव्ह स्मोकिंगची कोणतीही पातळी सुरक्षित नाही आणि धुम्रपान करणा-यांशी संपर्क टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.

महिलांमध्ये वंध्यत्व निर्माण होण्यामागे धुम्रपान हे एक महत्त्वाचे कारण आहे. महिलेने गर्भधारणा केल्यानंतरही धुम्रपान सुरू ठेवले तर गर्भपात अपरिपक्व प्रसूती आणि जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असणे इत्यादी परिणाम होऊ शकतात. गरोदर असताना धु्म्रपान केल्यास व्यंग असलेली बाळे म्हणजेच बाळाचे दुमडलेले ओठ किंवा खंडित टाळू असे व्यंग असू शकते. त्याचप्रमाणे बाळाचा अचानक मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारणही समजू शकत नाही.
थोडे नवीन जरा जुने