क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेसाठी संपूर्ण राज्यात २ हजार ३३२ टीम - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२: राज्यात आज कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे ,११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३ नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार २४४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

 निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १०६२ व्यक्तींच्या यादीपैकी ८९० व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ५७६ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. 

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ४ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.

 मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २ हजार ३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने