हृदयरोपण कसं होतं?महाराष्ट्रामध्ये सध्या हृदयरोपणांची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये मुंबईतील दोन लहान मुलांना नवी हृदये मिळाली. जगभरात दरवर्षी जवळपास १२०० हृदयरोपणं केली जातात.

हृदय बंद पडणे अथवा हार्ट फेल्युअर हे लहान मुलांमध्ये हृदयरोपण करावे लागण्याचे सर्वसाधारण कारण आहे. ब-याचदा हार्ट फेल्युअरकरिता कारणीभूत असलेल्या मूळ कारणावर उपचार करून हार्ट फेल्युअरवर उपचार केले जातात. अज्ञात कारणांनी किंवा उपचार न करता येण्याजोग्या कारणांनी हार्ट फेल्युअर झाले असे फार कमी वेळा घडते.

हार्ट फेल्युअरची समस्या जसजशी वाढत जाते, हृदयाचा आकार तसतसा वाढत जातो. या समस्येस डायलेटेड कार्डियोमायोपथी असे म्हणतात. या समस्येमध्ये २ वर्षाच्या मुलाचे हृदयही प्रौढ माणसाच्या हृदयाच्या आकाराइतके होऊ शकते. नेहमीच्या कामांनीही मूल थकायला लागते, इथपासून या समस्येची सुरुवात होते.

पाय सुजणे, चेहरा किंवा पोटाला सूज येणे, अतिथकव्याने मुलाला/मुलीला वारंवार हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. त्यांना तोंडी घ्यायची जी काही औषधे दिली जातात, ती त्यांच्या लक्षणांना बरे करण्यास असमर्थ ठरतात. घरच्या घरी पंपने द्यायची दोन इन्ट्राव्हेनस औषधे उपलब्ध आहेत, ज्यांनी बरं वाटू शकतं. पण, अशा वेळेस त्यांची हार्ट फेल्युअरची समस्या वाढत जाऊन त्यांचा मृत्यू होण्याची संभावना वाढीस लागते.

अशा मुलांमध्ये हृदयरोपण करणे हितावह ठरते. त्यांच्यावर हृदयरोपण करता येऊ शकते का, हे पाहण्याकरता सर्वप्रथम काही रक्त तपासण्या आणि इतर तपासण्या करून घेतल्या जातात. थोडक्यात, त्यांना हृदयाखेरीज इतर कोणत्याही अवयवाचा (विशेषत: फुप्फुसांचा) आजार नाही ना हे तपासले जाते. मग त्यांचे नाव विभागीय प्रत्यारोपण समितीच्या रोपण यादीमध्ये समाविष्ट केले जाते आणि त्याला हृदय देणा-या दात्याची प्रतीक्षा केली जाते.

त्यानंतर रुग्णाचे वजन आणि रक्तगट यांच्याशी मिळताजुळता मेंदू मृत पावलेला दाता शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. उपलब्ध असलेल्या हृदयाकरिता दोन मुलांचे अर्ज आलेले असतील तर ज्याची अवस्था अधिक गंभीर आहे त्याला हृदय दिले जाते.

सुयोग्य दात्याचे हृदय उपलब्ध झाल्यास त्याच्याशी मिळत्याजुळत्या मुलाला/मुलीला तत्काळ त्याचे/तिचे नाव नोंदवून घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले जाते. पद्धतशीर प्रक्रियेनंतर दात्याचे हृदय ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णापर्यंत पोहोचवले जाते. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या/तिच्या शरीरातून जुने हृदय काढण्याची सर्व तयारी झालेली असते.

नव्या हृदयाच्या रक्तवाहिन्या मुलाच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या जातात. मुलाच्या शरीराकडून नवे हृदय नाकारले जाऊ नये याकरिता त्याला विशिष्ट औषध दिले जाते (इम्युन-सप्रेसण्ट) त्या मुलाने/मुलीने आयुष्यभर हीच इम्युन-सप्रेसण्ट्स थोडया-थोडया प्रमाणात घेत राहणे गरजेचं असतं. रोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्भवू शकणारा सर्वात मोठा धोका म्हणजे शरीराने नवे हृदय नाकारणे, फुप्फुसांमधील दाबामुळे किंवा संसर्गामुळे हृदय नाकारले जाणे हा होय.

सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर शस्त्रक्रियेनंतर दहाव्या दिवशी मुलाला घरी पाठवलं जातं. घरी काळजी घेताना काय करावे आणि काय करू नये याची व घ्यायच्या खबरदा-यांची यादी त्या मुलाच्या/मुलीच्या कुटुंबाला दिली जाते. मुलाला संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे, सांगितलेली औषधे न चुकता घेणे आणि नियमितपणे फॉलो-अपकरिता येणे या त्यांतील काही गोष्टी होत.

पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे या काळात वारंवार फॉलो-अपकरिता यावे लागते, त्यानंतर फॉलो-अपचे प्रमाण कमी होते. काही गुंतागुंत झालीच, तर ती रोपणानंतरच्या पहिल्या वर्षात होण्याची शक्यता असते. रोपणानंतरचे पहिले वर्ष सुरळीत गेले तर मुलाची कुटुंब आणि रोपण करणा-या डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास टाकायला हरकत नसते.

हृदयरोपणानंतर मुलांची परिस्थिती कशी असते याबद्दल खूप सारा डेटा उपलब्ध आहे आणि या डेटानुसार त्यांची परिस्थिती रोपण केलेल्या प्रौढांपेक्षा अधिक चांगली असते असे दिसून आले आहे. हृदयरोपण केलेल्या शंभर मुलांपैकी ८५ मुले वर्षानतर जिवंत राहतात आणि चांगले आयुष्य जगतात असे या डेटातून दिसते.

२० वर्षानंतर यांतील ४५ मुले अजूनही जिवंत असतात आणि चांगले आयुष्य जगत असतात. या डेटाकडे नीट पाहिले तर हृदयरोपणाने त्या लहान मुलांच्या/मुलींच्या आयुष्यामध्ये केलेला आमूलाग्र बदल तुमच्या लक्षात येईल. रोपणापूर्वी त्या लहान मुलाचे/मुलीचे आयुष्य फारसे बरे नसते, त्याच्या/तिच्यावर मृत्यू सतत घिरटया घालत असतो. पण रोपणानंतर, ते मूल आनंदी जीवन जगू शकेल आणि एक चांगला, सक्रिय नागरिक बनू शकेल याच्या शक्यता खूप जास्त असतात.
थोडे नवीन जरा जुने