ऊन्हाळ्यातील आहार
उन्हाळ्याचे आगमन झाले. प्रकृती स्वास्थ्याच्या विचाराने वातावरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच परीक्षेनंतर येणारी सुट्टी सहलीला कोठे जावे सगळ्यांबरोबर संध्याकाळ सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालू राहणारी थंड पेयांची दुकाने, कोप-याकोप-यावर दिसू लागतात. वातावरणातील तापमान दिवसभरात बदलत असते. या अशा तापमानाचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. शरीराचे तापमान विशिष्ठ मयार्देत ठेवण्याकरिता उन्हाळ्यात विशिष्ठ आहार सेवन करणे जरूरीचे असते. या विषयी माहिती देणारा लेख..


उन्हाळ्याचे आगमन झाले की पंख्याची गरज भासू लागते. रात्री गच्चीवर झोपण्यास सुरूवात होऊ लागते, कोकीळेचा सुरेल आवाज कानावर पडू लागतो, जागोजागी रस्त्यावर थंड पेय विक्रेते दिसतात. काकड्या किंवा अननसासारखी फळे कापून काही ठिकाणी बर्फाच्या लादीवर ठेवलेली दिसतात. फळांचे थंड रस उपलब्ध करून देणारे फ्रूट ज्यूस बार्स आपला व्यवसाय जोरात चालवताना दिसून येतात. थंड ताक पिण्यास शरीरास उपयोगी असल्याने त्यांचे माठ घेऊन ते विक्रिस उपलब्ध असतात.

प्रकृतिस्वास्थ्याच्या विचाराने या सा-यांचा उपभोग कितपत योग्य आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. या सा-यांचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हा फार महत्वाचा मुद्दा आहे. किंबहूना मानवाच्या शरीराच्या आतल्या घडामोडी आणि शरीराबाहेरील वातावरणात होणारे बदल या दोघांत होणा-या देवाणघेवाणीवरच आपली प्रकृती अवलंबून असते. मानव आणि त्याचा परिसर यांच्या संबंधातील दुरावा म्हणजेच विकार. या संबंधातील अनुरूपता म्हणजेच स्वास्थ्य असे मानले जाते.

प्रत्येक ऋतु माणसाला जसे काहीना काहीतरी देणारे असतात त्याप्रमाणे ते त्यांच्या शरीरावर काहीना काही परिणाम करणारे देखिल असतात. प्रत्येक ऋतुत माणसाला ज्याप्रमाणे आपल्या परिधानात बदल करावे लागतात त्याप्रमाणे त्याला त्याच्या आहारात देखिल बदल करणे जरूरीचे असते. आता सध्या उन्हाळा आहे या उन्हाळ्यात वातावरणातील तापमान जसजसे उष्ण होत जाते तसतसा उष्णतेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. शरीराचे तापमान विशिष्ट मयार्देत (३७ अंश सेल्सियस + / -१ अंश) (९८.५ अंश फॅरेनहाईट+/- २ अंश) इतके असणे म्हणजे निरामय प्रकृतीचे लक्षण मानले जाते. पहाटे ते सर्वात कमी असते.

तसेच दुपारनंतर रात्रीपर्यंत ते दिवसभरात काही काळ जास्त असते. असे हे आपल्या शरीराचे तापमान तेवढेच ठेवण्याकरता आपल्या शरीरात एक मोठी यंत्रणा कार्यान्वित असते. वातावरणात वाढलेल्या आणि कमी झालेल्यासुद्धा तापमानाचा शरीरावर होणारा परिणाम दुरूस्त करणे हे या यंत्रणेचे काम असते.

वातावरणातील उष्णता वाढू लागली, की या यंत्रणेचे काम वाढू लागते. वातावरणात अतिरेकी बदल झाले , तर या यंत्रणेवर तणाव येतात. अशा तणावातून शरीरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. अशा एकूण १४ व्याधी ज्ञात आहे; पण त्यातल्या महत्वाच्या म्हणजे उष्माघात, उन्हाळ्याचा थकवा, उन्हाळ्यात येणारे पेटके, उन्हाळ्यात फीट येऊन पडणे या होत.

वातावरणातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिवाय आपले अन्न, पाणी, निवारा,वस्त्रे इत्यांदीवर आपले स्वास्थ्य अवलंबून असते. वातावरणातील अनेक गोष्टीत आपल्या सोयीचे बदल करून माणसाने घेतले आहेत. हवामानात होणारे बदल मात्र अद्याप आपल्या ताब्यात आलेले नाहीत. पिण्याचे व इतर वापरासाठी असणारे पाणी, घरात व शहरात खेळती हवा असणे, घरातील उजेड, परिसरातील ध्वनिप्रदूषण, विविध प्रकारचे किरण, वातावरणाचा दाब, हवेतील आद्रता, पावसाचे प्रमाण, वा-याचा वेग आणि दिशा, ढग असणे आणि तापमान या सा-यांचा आपल्या प्रकृतिवर इष्टानिष्ट परिणाम होत असतो. उन्हाळ्यातदेखिल केवळ हवेचे तापमान वाढणे एवढेच घडते असे नसून आद्रता, वारे, दाब, ढग येणे वगैरे सर्वात कमी-जास्त बदल होत असतात. या सा-यांपासून आपण आपला बचाव विविध स्तरांवर करीत असतो. घरे बांधताना त्यांचा विचार होतो. सहलीला जाण्याची जागा ठरते. पेहराव, खाणे-पिणेही ठरते.

उष्मांकांच्या विचारात उसाच्या रसाकडे नजर टाकणे आवश्यक आहे. उसाच्या रसात प्रती १०० ग्रॅममध्ये ९०.२ पाणी, ०.१ प्रथिने, ०.२ ग्रॅम स्निग्धता, ०.४ ग्रॅम खनिज पदार्थ, चोथा ०, कबरेदके ९.१ ग्रॅम ३९ उष्मांक, १० मिलीग्रॅम कॅल्शियम, १० मि. फॉस्फरस व ०.१ मिलीग्रॅम लोह असते. साधारण लहान ग्लास १०० मिलिलीटर व मोठा ग्लास १८० मिलिलीटरचा असतो. त्यातून सामान्यत: ४० ते ७० उष्मांक मिळतील. त्यातील खनिजांचा व लोहाचा थोडा फायदाही आहे. हे जरी त्याचे गुणधर्म असले, तरी परिसरातील स्वच्छता हा मोठा विचार केला गेला पाहिजे.

रस काढण्याच्या चरकाची स्वच्छता, उसाच्या कांड्या धुतलेल्या आहेत किंवा नाहीत, तेथील कर्मचा-याचे हात स्वच्छ असणे, ग्लास विसळणे, आजूबाजूला माशांचा वावर या गोष्टी महत्वाच्या असतात. याहूनही सर्वात महत्वाचा मुद्दा बफार्चा असतो. हा बर्फ ज्या पाण्यापासून बनलेला असतो त्या पाण्यातून अनेक प्रकारे विकार होऊ शकतात. कावीळ, पोलिओसारखे विषाणू, कॉलरा, टायफॉईड, पॅरा टायफॉईड, बॅसिलरी डिसेंट्री इ. अशा अनेक आजारांचे मूळ पाण्यात असते.

शरीराचे तापमान दोन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते. शरीरात निर्माण होणारी उष्णता एकीकडे आणि शरीरातील उष्णतेचा निचरा दुस-या बाजूला. या दोन घटना एकमेकींसारख्या असल्या, तर तापमान आहे तेवढे राहील. शरीरात उष्णता अधिक निर्माण झाली किंवा उष्णता बाहेर टाकण्यात व्यत्यय आला तर परिणामी शरीराचे तापमान वाढून दोष निर्माण होऊ शकतात.

वातावरणातील भौतिक बदल (पंखा लावणे, कूलर किंवा एअर कंडिशनर वापरणे, वा-यावर बसणे, सावलीत राहणे या गोष्टी शक्यतो आपण करतोच; पण आपल्या आहारावरदेखील ही तापमान नियंत्रीत ठेवणारी शरीरांतर्गत यंत्रणा अवलंबून असते. शरीरात उष्णता निर्माण होण्याची दोन महत्वाची ठिकाणे म्हणजे स्नायूंचे आकुंचन प्रसरण होणे आणि अन्नघटकांचे चयापचय होणे. उन्हाळ्यात शारीरीक श्रम करण्याने शरीराचे तापमान चटकन वाढते.त्यामुळे बंद जागेत केलेल्या व्यांयामाने लवकर घाम येतो.

तापमान नियंत्रित करणा-या यंत्रणेवर ताण अधिक पडेल. मैदानी खेळ किंवा टेकडीवर खेळत्या हवेत होणारा व्यायाम, सावलीतील चालणे, उन्हाच्या वेळा टाळून घराबाहेर पडणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे. कडक उन्हात बराच वेळ राहणे व चालणे हे उष्माघाताचे प्रमुख कारण.

मद्य पेयांत महत्त्वाचा घटक इथाइल अल्कोहोल हा असतो, व्हिस्की, ब्रॅडी, रम इत्यादीत ४३ ते ४५ टक्के शेरी व वाइन्समध्ये २० टक्के व बीअरमध्ये ७ टक्के इथाइल अल्कोहोल असते. साधारण १ पेग व्हिस्की, १ ग्लास वाइन व १ लहान ग्लास शेरी यात ९ ग्रॅम इ. अल्कोहोल असते. एका बीअरच्या बाटलीत ६५० मिली लिटर बीअर असते. त्यात बीअरच्या प्रकारानुसार १२ ते ४० ग्रॅम्स इथाईल अल्कोहोल असते. प्रत्येक ग्रॅममधून ७ उष्मांक मिळतात हे आपण पाहिले आहेच.

एक बाटली बीअर पिण्याने ८४ ते २८० उष्मांक शरीराला उपलब्ध होतात. त्या पेयाबरोबर होणारे खाणे सहसा तळलेले, खारावलेले मसालेदार व चटकदार (भेळ, शेव, भजी, तळलेले शेंगदाणे इत्यादी) उष्मांकांची रेलचेल असणारे असते. बीअर पिणे व असे खाणे म्हणजे शरीरात उष्मांक वाढविण्यास आमंत्रण देणे होय. याचा उष्णता नियंत्रक यंत्रणेला कसा फायदा होईल शिवाय या इथाइल अल्कोहोलचे शरीरावर होणारे अपरिमित हानिकारक परिणाम (यकृताच्या पेशींना अपाय, मेंदूच्या पेशींचे कार्य न होणे, हदयाच्या स्नायूंच्या प्रथिनांची बांधणी विसकटणे, हडे ठिसूळ होणे, दृष्टीवर विपरीत परिणाम होणे, स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होणे, स्वादुपिंडाचा प्राणघातक दाह होणे, हातापायाच्या शिरा कमजोर होणे, नपुसंकत्व येणे, स्नायू कमजोर होणे, फुफ्फुसाचे अनेक आजार होण्यास निमंत्रण मिळणे, रक्तक्षय शरीरातील विविध भागांतील कर्करोग, गर्भावर होणारे परिणाम इत्यादी) ध्यानात ठेवता बीअर पिण्याने होणारे नुकसान वेगळे सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.
शिवाय अशा प्रसंगी धूम्रपानही अमर्याद होण्याची शक्यता असते व त्याने होणारे अपाय या मद्यपानाच्या अपायांना द्विगुणित करतात.

संत्र्याचा रस:

संत्र्याच्या रसात प्रति १०० ग्रॅममध्ये ९७.७ ग्रॅम्स पाणी असते, ०.२ ग्रॅम प्रथिने, ०.१ ग्रॅम्स स्निग्धता, ०.१ ग्रॅम खनिजे, चोथा ० कबरेदके १.९ ग्रॅम्स उष्मांक ९ कॅलिशियम ५ मिलिग्रॅम फॉस्फरस ९ मि.ग्रॅ. लोह ०.७ मि.ग्रॅ. असते.उसाच्या रसातील प्रतीशंभर ग्रॅममधील ३९ उष्मांकांच्या मानाने संत्र्यांच्या रसात फक्त ९ उष्मांक आहेत. हा विचार वजन ताब्यात ठेवण्याच्याही दृष्टिने महत्वाचा आहे.

मोसंबीचा रस :

मोसंबीच्या दर १०० ग्रॅम रसात ८८.४ ग्रॅम पाणी, ०.८ प्रथिने, ०.३ ग्रॅम स्निग्धता, ०.७ ग्रॅम्स खनिजे, ०.५ ग्रॅम चोथा, ९.३ ग्रॅम्स कबरेदके, ४३ उष्मांक, ४० मिलीग्रॅम्स कॅलियम, ३० मि,लीग्रॅम्स फॉस्फरस व ०.७ मिलिग्रॅम लोह आहे. उष्माकांच्या विचारात ताक बरे, नीरा मध्ये 1०० ग्रॅम ४५ उष्मांक आहेत, तर नारळाच्या पाण्यात २४ आहेत. त्यामुळे आपणच ठरवावे की उन्हाळ्यात काय थंड प्यावे आणि काय नाही.
थोडे नवीन जरा जुने