घरगुती रामबाण उपायसध्या शहरांचा विकास जोरात सुरू आहे. उंच इमारतींसोबत रस्ते, उड्डाणपूल यांची कामे जोरात सुरू आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे व त्यांच्या आरोग्यावर या सगळ्यांचा वाईट परिणाम होत आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी व धुक्यामुळे धूलिकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात.
तसेच वृक्षांची गळलेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्यामुळे धूर तयार होऊन तो वातावरणात मिसळतो. हे सर्व धूलिकण, धूर, धूळ, श्वासोच्छ्वासावाटे आपल्या फुप्फुसात, नाका-तोंडात जाऊन विविध आजार होतात. यामुळे सगळीकडे हे विकार पसरतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे असे आजार होतात आणि ते वाढत जातात, त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि मणक्याचे आजार होऊ शकतात. या विकारांवर आपण घरबसल्या उपाय करू शकतो. हे आजार टाळण्यासाठी काही उपाय तुमच्यासाठी.

सर्दी, शिंका, खोकला

वातावरणातील असलेल्या धूलिकिरणांमुळे सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास होतो. याचा त्रास किरकोळ वाटत असला तरी नंतर तो त्रासदायक ठरातो. यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुडय़ांना आतून तिळाचे तेल लावावे.

तसेच नाकाला आणि तोंडाला रुमाल बांधावा. वातावरणात गारवा असल्यामुळे कोमट पाणी प्यावे. बाहेरून आल्यावर कोमट पाण्यानेच हात, पाय, चेहरा धुवावा. गुळण्या करून घसा साफ करावा. गळ्यापासून वर चेह-याला तेल लावून गरम पाण्याची वाफ घ्यावी. ‘नस्य’ हा पंचकर्मातील उपचार घ्यावा.

दमा

दमा हा स्वतंत्र आजार आहे. यासाठी उपाय असे की धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत. बाहेर जाण्याआधी नाकपुडय़ांना तिळतेल लावावे. चेह-याला रुमाल बांधावा. नियमित नस्य करावे. अंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालिश करावे. नियमितपणे ३० मिनिटं व्यायाम कारावा, असे केल्यास दमा कमी होऊ शकतो. कांद्याचा रस, आल्याचा रस, तुळशीची पाने आणि मध योग्य प्रमाणात वापरल्यास दमा नष्ट होऊ शकतो.

डोळ्यांचे विकार

गाडीवरून जाताना गॉगल वापरावा. डोळ्यांत कचरा गेल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. डोळे धुतल्यानंतर कापसाने स्वच्छ करावेत. तरीही कचरा न निघाल्यास वेळीच वैद्यांकडे जावे. डोळे जास्त लाल झाल्यास किंवा डोळ्यांतून जास्त पाणी येत असल्यास गुलाबपाण्याने डोळे धुवावेत. गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घडय़ा डोळ्यांवर ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांस आराम मिळतो. ‘नेत्रतर्पण’ केल्यास डोळ्यांचे विकार बरे होऊन त्यांचे आरोग्य सुधारेल.

घसा दुखणे / घसा खवखवणे

त्रिफळा काढा आणि हळदीचा काढा बनवून घ्यावा आणि काढा दिवसांतून तीन वेळा घेऊन गुळण्या कराव्यात. १-१ चमचा मध तीन-चार वेळा चाटावा. दूध, साखर आणि हळद याचे गरमागरम मिश्रण प्यायल्यामुळे व लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होऊ शकते. बरेच वेळा घसा खवखवण्याचा त्रासही आपल्याला होतो. अशा वेळी घसा खवखवत असल्यास खडीसाखर आणि कात (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा, त्याने खूपच आराम िंमळतो.

घसा बसणे / जळजळ होणे

यावर उपाय असा की वेलदोडा दाणे आणि साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून घसा बसण्यावर व जळजळण्यावर आराम मिळू शकतो.

मान, पाठ, कंबरदुखी

खड्डे, खाचखळगे आणि वाहन चालविणे यामुळे हा त्रास होतो. यामध्ये दोन प्रकारे त्रास होऊ शकतो जसे की, स्नायू दुखल्यामुळे आणि मणक्याच्या विकारामुळे यांपैकी कुठलं कारण आहे हे पहिलं जाणून घ्या. स्नायू दुखल्यामुळे त्रास असेल तर योग्य त्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. तसेच औषधी तेलाने मसाज करून औषधी काढा प्यावा. मणक्याच्या विकारामुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, आणिकाढा प्यावा. औषधी तेल, काढा यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास आणि योग्य त्या वैद्यांकडे जाऊन सल्ले घेतल्यास आपण या आजारांना टळू शकतो.
थोडे नवीन जरा जुने