...अशी ही ओंजळ ओतप्रोत संवेदनशीलतेची; सुहित जीवन ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

मुंबई, दि. ६ : किती देता याला महत्त्व नाही. पण देणाऱ्याची ओंजळ संवेदनशीलतेने ओतप्रोत असेल, तर ती निश्चितच आगळी ठरते. याचाच प्रत्यय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुहित जीवन ट्रस्टच्या गतीमंद व बहुविकलांग शाळेच्यावतीने जमा करण्यात आलेला निधी.


 रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व उरण तालुक्यातील गतीमंद व बहुविकलांगासाठी गेली पंधरा वर्षे कार्यरत या संस्थेने आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी थेट पंचवीस हजार रुपयांचा धनादेश एका पत्रासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.


कोरोना विषाणुच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रयत्नशील आहे. या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ या माध्यमातून जमा केला जात आहे. या निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदींनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अगदी वाढदिवसासाठी साठविलेले पैसेही या निधीत देण्यासाठीही चिमुकले खारीचा वाटा उचलू लागले आहेत.


गतीमंद आणि बहुविकलांगाच्या कल्याणासाठी कार्यरत सुहित जीवन ट्रस्टसारख्या संस्थाही पुढे येऊ लागल्या आहेत. संस्थेच्या विश्वस्तांनी पाठविलेल्या पत्रात आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत आहेत. समाज आणि शासन वेळोवेळी आमच्या मदतीसाठी धावून येते. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत समाजाचे अल्पसे ऋण फेडण्याचा संस्थेचे विद्यार्थी, पालक, कर्मचारी आणि विश्वस्त यांचा ही प्रयत्न असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले आहे.
थोडे नवीन जरा जुने