धूम्रपान मानसिक आरोग्यासाठी असा आहे धोकादायक


भारतातील बहुतेक धूम्रपान करणा-यांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे धूम्रपान सोडणे. लोक धूम्रपान सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांना धूम्रपान सोडणे शक्य होत नाही. धूम्रपान करणारे लोक केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तणावाला अधिक बळी पडतात..

चूझ लाइफ या अभ्यासानुसार, धूम्रपान करणा-या लोकांची वर्तणूक ते न करणा-या लोकांच्या तुलनेत २०० टक्के अधिक अतिसंवेदनशील असते. एवढेच नाही तर धूम्रपान करणा-यांमध्ये तणावाला बळी पडण्याचे प्रमाण ते न करणा-यांच्या तुलनेत १७८ टक्के अधिक आहे. याशिवाय सतत झोपमोड होणे, अपुरी झोप, प्रेरणेचा अभाव, अति खाणे किंवा कमी खाणे आणि घरात किंवा कामाच्या ठिकाणी रागाचा उद्रेक या समस्याही धूम्रपान करणा-यांमध्ये आढळतात.

धूम्रपानाचे आरोग्यावर होणा-या गंभीर परिणामांची जाणीव असूनही, पाहणी केलेल्यांपैकी ७४ टक्के लोकांना धूम्रपान सोडणे खूप कठीण आहे असे वाटते. चारापैकी तीन जणांनी ते आजारी असतानाही धूम्रपान करतात असे सांगितले, तर दहापैकी आठजणांना झोपेतून उठल्या उठल्या धूम्रपानाची तीव्र इच्छा होते, असे त्यांनी नमूद केले. चिंतेची बाब म्हणजे धूम्रपान करणा-या पुरुषांपैकी ६५ टक्के जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पाचपैकी चार जणांमध्ये कार्बन मोनोक्साइडचे प्रमाण धूम्रपान न करणा-यांच्या तुलनेत अधिक आढळले. उच्च रक्तदाब आणि कार्बन मोनोक्साइडचा वाढलेला स्तर या दोहोंचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात.

तंबाखूच्या सेवनाने भारतात दरवर्षी नऊ लाख लोकांचे प्राण जातात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, तंबाखूने होणा-या आजारांमुळे देशाला दरवर्षी १६ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसतो. त्यामुळेच अधिकाधिक धूम्रपान करणा-यांना ते सोडण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे.

धूम्रपान सोडण्याच्या शास्त्रीय पद्धतींना योग्य समुपदेशनाची जोड मिळणे भारतातील धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे आहे, असे फोर्टीस व नानावटी रुग्णालयातील आघाडीचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. प्रशांत छाजेड यांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयातील प्रमुख पल्मोनोलॉजिस्ट डॉ. प्रल्हाद प्रभूदेसाई म्हणाले, सर्वात मोठे आव्हान म्हणजे धूम्रपान करणा-या बहुतेक लोकांना धूम्रपानाचे परिणाम किती गंभीर आहेत याची जाणीव असते, तरीही ते धूम्रपान करत राहतात. त्यांना वाटते की, धूम्रपानामुळे त्यांच्यावरील ताण कमी होतो आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढते.

धूम्रपान करणारे लोक ते न करणा-यांच्या तुलनेत मानसिक तणावाला अधिक बळी पडतात. सर्वेक्षणानुसार, धूम्रपान करणा-यांपैकी सुमारे ८८ टक्के लोकांना ही सवय वयाच्या चोविसाव्या वर्षाच्या आत लागली आणि ५५ टक्के लोकांनी धूम्रपानाला सुरुवात केवळ मजा म्हणून केली.

सर्वेक्षणात म्हटल्यानुसार, धूम्रपानाची सवय केवळ गंमत म्हणून सुरू होते व नंतर ती प्राणघातक होते. धूम्रपान करणारे ही सवय सोडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण बहुतेकांना सिगारेटपासून दूर राहणे कठीण जाते. त्यांच्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतो. प्रत्येक एचआर विभागाने याची दखल घेतली पाहिजे. तणाव आणि कामाचा वाढता भार या कारणांमुळे धूम्रपान सुरू होते.

विरोधाभास म्हणजे, धूम्रपानामुळे तेवढय़ापुरते तणावमुक्त वाटत असले तरी याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे दूरगामी परिणाम खूपच वाईट आहेत. प्रत्येक धूम्रपान करणा-याने सिगारेट ओढताना याचा विचार केला पाहिजे, असे विक्रम रुग्णालयातील प्रमुख कन्सल्टण्ट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. वसुनेत्रा कासारगोड म्हणाल्या.
थोडे नवीन जरा जुने