हेपेटायटिस दरम्यानची काळजी
हेपेटायटिस दरम्यान पुरेसे पोषण अतिशय महत्त्वाचे आहे. वाढीव कॅलरीज आणि प्रोटिन्ससोबत संतुलित आहार घेणे उतींच्या पुनर्निमाण प्रक्रियेसाठी ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे म्हणूनच हेपेटायटिस दरम्यान काय खावे आणि काय खाणे टाळावे याविषयीची ही माहिती.

हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात. मुंबईत दर वर्षी एक लाखात ६.६ नवीन केसेस पाहायला मिळतात. (स्त्रोत: लोकसंख्येवर आधारित कॅन्सर रजिस्ट्री २०१४) वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या.

हेपेटायटिस दरम्यान पुरेसे पोषण अतिशय महत्त्वाचे आहे. वाढीव कॅलरीज आणि प्रोटिन्ससोबत संतुलित आहार घेणे उतींच्या पुनर्निमाण प्रक्रियेसाठी ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हेपेटायटिसमध्ये संतुलित आहाराची शिफारस केली जाते.

हे अन्नपदार्थ खाणे टाळाच

हेपेटायटिसमधून बरे होण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये लिव्हरसाठी कठीण असलेले आणि तुलनेने कमी पोषक पदार्थ असलेले घटक समाविष्ट होतात.

» प्रक्रिया केलेले ब्रेड्स, चीज आणि जवळपास सर्व फास्ट फुड प्रकार हेपेटायटिसच्या दरम्यान टाळले पाहिजेत. कारण ते बरे होण्याच्या वेळेला दुर्धर बनवतात. हायड्रोजनयुक्त तेलांऐवजी सकस तेल वापरावे.

» उच्च प्रमाणात सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट्स असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.

» साखर ग्रहण करणे निरोगी लिव्हरच्या दृष्टीने मर्यादित करावे. यामध्ये कृत्रिम स्विटनर्स व फ्रुट ज्युसचा समावेश होतो. ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे पचवणे हेपेटायटिसने बाधीत लिव्हरसाठी कठीण होऊ शकते.

» हेपेटायटिस असलेल्या रुग्णांच्या आहारामध्ये मांस खाणे विशेषत: रेड मीट खाणे टाळले पाहिजे. तुम्हाला हवेच असेल तर तुम्ही एग व्हाईट्स आणि लीन मिट्स खाऊ शकता पण आठवडयातून एकदा किंवा दोनदा.

» निरोगी लिव्हरसाठी अल्कोहोल आणि सिगारेट टाळावी.

» व्हिटामीन सप्लिमेंट्स किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जादा औषध घेणे टाळावे.

» अन्न खाणे टाळू नये. लहान लहान भागांमध्ये अन्न ग्रहण करावे आणि मोठया प्रमाणात पाणी प्यावे व पुरेशी विश्रांती घ्यावी.

» हेपेटिटीस असताना बाहेर खाणे टाळावे.

» अन्न ताजे असण्याची आणि स्वच्छ ठिकाणी तयार केले गेल्याची खात्री करून घ्यावी.

» हेपेटायटिसच्या दरम्यान कोणते अन्नपदार्थ खावेत

» अख्खे धान्य खाणे हेपेटायटिससाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

» फळे आणि भाज्या अन्नाचा अविभाज्य घटक असावे. कारण त्यामुळे लिव्हरच्या आजारापासून लवकर बरे होण्यास मदत मिळते. त्यामध्ये आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे असतात आणि ती पचण्यासाठी देखील हलकी असतात. बोनस म्हणजे त्यात अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे लिव्हर सेल्सचे क्षती होण्यापासून रक्षण करतात.

» ऑलिव्ह ऑईल, कनोला ऑईल, फ्लेक्सिड ऑईलमध्ये शिफारस केलेल्या सर्व सकस फॅट्स असतात, ज्या हेपेटायटिस झालेल्या रुग्णांच्या आहारामध्ये शिफारस केल्या जातात.

» लो फॅट मिल्क, डेयरी उत्पादनांसोबत लीन मिट्स, बिन्स, अंडी, सोया उत्पादने निरोगी लिव्हरच्या आहारामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात.

कावीळचे समज- गैरसमज

एखादा सांडपाण्याचा पाईप व पिण्याचा पाण्याचा पाईप एकत्र येत असतील व सांडपाण्याचे मिश्रण पिण्याच्या पाण्यात होत असेल तर त्या भागात काविळीची साथ आढळून येते; परंतु जोपर्यंत स्वत:ला किंवा जवळच्या एका नातेवाइकाला कावीळ होत नाही तोपर्यंत काविळीचे गांभीर्य आपल्या समाजात कुणाच्या लक्षात येत नाही.

दूषित अन्न व पाणी हेच हेपेटायटिस आजार पसरण्याचे प्रमुख कारण आहे. हेपेटायटिस म्हणजेच कावीळ. हा व्हायरल इंफेक्शनमुळे होत असल्याने त्या रोगजंतूच्या प्रकारानुसार त्याचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ असे ६ प्रकारांत विभाजन केले आहे. या सहा प्रकाराच्या रोगजंतूंमुळे होणा-या आजाराच्या गंभीरतेमुळे सर्व जगभर हा चिंतेचा विषय होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक हेपेटायटिस या आजाराने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात.

हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे पोट व यकृत विकार तज्ज्ञ डॉ. मृदुल धारोड म्हणाले, ‘‘मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पावसाळा सुरूझाल्यापासून कावीळ झालेले अनेक रुग्ण भरती झाले असून पुढील दोन ते तीन महिन्यांत रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

हेपेटायटिस सहा प्रकारच्या विषाणूंमुळे होत असला तरी वैद्यकीय क्षेत्रात हेपेटायटिस ‘बी’ हा सर्वात जलद गतीने पसरणारा रोगजंतू आहे. शरीरातील द्रवाशी संपर्क आल्याने (रक्त, लाळ, विर्य किंवा मूत्र) हेपेटायटिस बी म्हणजेच कावीळचा संसर्ग होतो. परंतु सामान्य जनमानसात दुर्दैवाने याविषयी जागरूकता आलेली नाही. एखाद्या शुष्क असलेल्या रक्ताच्या थेंबात हेपेटायटिस बी-चा विषाणू सहा दिवसांपर्यंतही जिवंत राहू शकतो आणि दुस-या शरीरात संक्रमितसुद्धा होऊ शकतो. कावीळ झाली आहे किंवा होते आहे किंवा नुसता काविळीचा संशय जरी आला तरी लोक प्रथम धाव घेतात ती स्थानिक हकीम अथवा वैद्याकडे, आपल्या देशात काविळीवर अ‍ॅलोपथीमध्ये काहीही औषध नाही, हा समज वा गरसमज ब-याच प्रमाणात घट्ट पाळमुळे रोऊन बसलेला आहे.

एका दिवसात रक्ताच्या चाचणीतून हेपेटायटिसचा कोणता विषाणू आहे हे न तपासता रुग्णाचे नातेवाईक झाडपाला, चुन्याची निवळी अथवा पावडर असे उपचार करून दिवस वाया घालवताना दिसतात व ही स्थिती आजही जागतिक क्रमवारीत आरोग्यक्षेत्रामध्ये पुढे असणा-या मुंबई शहरात दिसून येते.’

ज्यांना हेपेटायटिसच्या विषाणूची बाधा झालेली नाही अशा व्यक्तींनी भविष्यात सुरक्षितता म्हणून हेपेटायटिस बी-साठी उपलब्ध असलेली लस घेणे नेहमीच फायद्याचे ठरते. आजपर्यंतच्या सर्वेक्षणानुसार ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले आहे व ही लस आता नवजात अर्भकांसाठीदेखील उपलब्ध आहे.

हेपेटायटिस ए-साठीची लसही उपलब्ध असली तरी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जवळजवळ सर्वानाच हा विषाणू बालपणीच गाठतो. त्यामुळे तिचा फारसा उपयोग होत नाही. अशी लस हेपेटायटिस सी या विषाणूसाठी उपलब्ध नसून हेपेटायटिस जी हा नवीनच विषाणू आहे व त्याच्यावरील संशोधन अजून सुरू आहे. हेपेटायटीस
बी-ची लागण झालेल्या व्यक्तींना हेपेटायटिस-डी होतो. दूषित पाणी किंवा अन्नातून

‘हेपेटायटिस ए’ व हेपेटायटिस ई-ची बाधा होते, अशी माहिती मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे पोट व यकृत विकारतज्ज्ञ डॉ. मृदुल धारोड यांनी दिली. बी, सी व डी हे विषाणू रुग्णाच्या शरीरात दीर्घकालीन वास्तव्य करून हळूहळू त्याचे यकृत पोखरण्याचे कारस्थान सुरू ठेवतात. याची परिणती शेवटी यकृत निकामी होण्यात किंवा यकृताचा कर्करोग होण्यात होऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने