आत्महत्या रोखण्यासाठी संवाद महत्त्वाचा..
असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या अहवालानुसार, आत्महत्या ही सर्वाधिक धोकादायक आणि मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या असून, दर वर्षी १० लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू हा आत्महत्येच्या मार्गाने होतो. ‘एक क्षण थांबा, आणि आयुष्य बदलून टाका’, ही यंदाच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची थीम आहे.

बराच काळ समाजाच्या विविध स्तरांना हलवून सोडणा-या आत्महत्यांसारख्या या सामाजिक समस्येला समाजातून हद्दपार करण्यासाठी व सार्वजनिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी एओएच या संघटनेने सर्वसामान्य माणसांना एकत्र येऊन कार्य करण्याची विनंती केली आहे. सक्रियपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे, सर्वाना त्यांच्या-त्यांच्या मनातील भीती आणि न्यूनगंड दूर करण्यासाठी मानसिक सहाय्य पुरवणे यांसारख्या उपक्रमांतून आत्महत्या विरोधी जागरूकता पसरवणे हे एओएचचे मुख्य उद्दिष्ट असून यामुळे सर्वसामान्यांची आयुष्ये बदलणार आहेत.

असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी. एम. भुजंग म्हणाले, तणावापासून दूर राहण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. समस्यांचे निवारण नेमके कशाप्रकारे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करून आपापल्या समस्यांविषयी इतरांशी चर्चा करणे आवश्यक असते. मानसिक आजारांवर मात करण्याबरोबरच नकारात्मक विचारही मनात येऊ देऊ नयेत.

तरुणांमध्ये ऑनलाइन राहण्याचे व्यसन फारच झपाटय़ाने वाढत चालले आहे. म्हणूनच, पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण नाते प्रस्थापित करणे गरजेचे झाले असून, सतत त्यांच्या वागण्याचे परीक्षण करता कामा नये. ब्लू व्हेल गेममार्फत झालेल्या आत्महत्यांमागेही पालकांसोबतच्या संवादाचा अभाव हेच कारण आहे. जगभरातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील मुलांच्या मृत्यूंमागे आत्महत्या हे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण आहे.

मन तणावमुक्त ठेवण्यासाठी काही टिप्स

तणाव निर्माण करणारे विचार ओळखा.

 कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराशी संवाद साधा.

तुमच्यासह झालेल्या सर्व सकारात्मक घटनांचा विचार करा.

 मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्या. रुग्णाच्या आरोग्याप्रती तुम्हाला वाटत असलेली काळजी व्यक्त करा आणि अति काळजी करणेही टाळा.

 ध्यानधारणा करा आणि एखादा छंद जोपासा.
थोडे नवीन जरा जुने