रजोनिवृत्ती, मानसिक ताण अन् हृदयविकार
रजोनिवृत्तीचा काळ हा महिलांच्या आयुष्यातला एक कठीण काळ समजला जातो. शरीरात झालेल्या बदलांमुळे मानसिक ताण, हृदयात धडधड होणे, घाम येणे, अंग गरम होणे, अतिसार, वारंवार मूत्रप्रवृत्ती, तोंडाला कोरड पडणे, झोप कमी होणे, हाता-पायाला कंप सुटणे अशी लक्षणे आढळून येतात, परंतु जागरूकता नसल्यामुळे अनेक महिला या आजारांकडे दुर्लक्ष करतात व पुढे हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला बळी पडतात.

मुंबई-ठाणे-पालघरसारख्या समाजात आजही मासिक पाळीला विटाळ मानला जातो व याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. नेदरलँडमध्ये २०१५ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये ३० टक्के हृदयविकार व ५० टक्के सांधेदुखी वाढल्याची ठळक लक्षणे दिसून आली होती.

रजोनिवृत्ती हा महिलांच्या आरोग्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून याकडे आपण दुर्लक्ष केले तर अनेक जीवघेणे आजार वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे . स्त्रीच्या आयुष्यात वयाच्या १२ ते १४व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते व साधारण चांद्रमासाच्या अवधीनं दर महिन्याला चालू राहते. वयाच्या ४५ ते ५० वर्षापर्यंत मासिक पाळी चालू राहते व त्या काळात गरोदरपण आल्यास त्यात तात्पुरता खंड पडतो.

वयाची ४५ वर्षे झाल्यावर बीजग्रंथीचं कार्य संपुष्टात येतं व त्यानंतर बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे व बीज ग्रंथीमध्ये आंतररस (होर्मोन्स) तयार होण्याचं थांबल्यामुळे मासिक पाळी येणं शक्य नसतं. पाळी हळूहळू कमी प्रमाणात येऊ लागते किंवा चांद्रमासापेक्षा उशिरा येऊ लागते व काही काळानंतर ती कायमची बंद होते. या काळाला रजोनिवृत्ती काळ म्हणतात.

परंतु आता बदलत्या काळानुसार रजोनिवृत्तीनंतरचा काळ हा महिलांसाठी कठीण होत चालला आहे. याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंगला पाटील सांगतात, ‘‘रजोनिवृत्तीचा काळ हा महिलांच्या आयुष्यातला एक कठीण काळ समजला जातो.

शरीरात झालेल्या बदलांमुळे मानसिक ताण, हृदयात धडधड होणे, घाम येणे, अंग गरम होणे, अतिसार, वारंवार मूत्रप्रवृत्ती, तोंडाला कोरड पडणे, झोप कमी होणे, हातापायाला कंप सुटणे अशी लक्षणे आढळून येतात, परंतु रजोनिवृत्तीविषयी समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे अनेक महिला या आजारांकडे दुर्लक्ष करतात व पुढे हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला बळी पडतात.’’ रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीच्या बीजग्रंथीच्या आंतररसामुळे हृदयविकार, सांधेदुखी, अतिरक्तदाब वगरे विकारपासून स्त्रीचं नसर्गिक संरक्षण होते, पण रजोनिवृत्तीनंतर हेच विकार वाढण्याचे प्रमाण दिसून येतात.

रजोनिवृत्तीचा काळ स्त्रीच्या आयुष्यातील परिवर्तनाचा काळ असतो. त्यामुळे डॉक्टरांना भेटून वारंवार होत असलेल्या आजारांवर योग्य ते उपाय केल्यास गंभीर आजारांपासून महिला दूर राहतील असा विश्वास ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंगला पाटील यांनी जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त व्यक्त केला. रजोनिवृत्ती व हृदयविकार यांचा संबंध सांगताना बांद्रा येथील लीलावती हॉस्पिटलमधील ज्येष्ठ हृदय शल्यविशारद डॉ. पवन कुमार सांगतात, ‘‘रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये मोठया प्रमाणावर दिसणा-या मानसिक समस्या म्हणजे चिंतारोग (एन्झायटी) आणि नराश्य होय व यामुळे त्या उच्च रक्तदाबाला बळी पडत आहेत.

विशेषत: शहरी भागात ऑफिसला जाणा-या महिलांमध्ये धूम्रपान, मद्यपान, वाढलेले वजन आणि कौटुंबिक इतिहास, वाईट जनुके आदी घटक लक्षात घेतले तर त्यांचा रक्तदाब अधिक असतो व त्यामुळे त्यांना तर मधुमेहाचा धोकाही वाढलेला असतो व अशामध्ये रजोनिवृत्तीच्या वेळी योग्य काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा आजार जडू शकतो.

रजोनिवृत्ती झाल्यानंतर इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन कमी झाल्यामुळे वैद्यकीयदृष्टया इतर महिलांपेक्षा रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये २० टक्के हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते व हे प्रमाण शहरातील महिलांमध्ये २५ टक्के आढळून येत आहे.’’ उच्च रक्तदाब, नराश्य व रजोनिवृत्ती अशा विचित्र त्रिकोणात आजची महिला अडकली असून मासिक पाळी व आजार याविषयी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे असे मत ज्येष्ठ हृदय शल्यविशारद डॉ. पवन कुमार यांनी व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने